धनगर समाजाचा अनुसूचित जातीजमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी १९ डिसेंबर रोजी लाखो धनगर नागपूर अधिवेशनात टक्कर मोर्चाचे आयोजन केल्याचे धनगर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णा डांगे यांनी सांगितले.
येथील मुक्ताबाई मठात कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. या वेळी प्रदेश अध्यक्ष डॉ. वसंतराव लवणकर, उपाध्यक्ष आर. जे. रूपनवर आदी होते. सरकारने नवीन सहकारातील कायद्यात दुरुस्ती केली असून यामुळे भटक्या विमुक्त, ओ.बी.सी. जातीचे आरक्षणच रद्द केल्याने या जातीतील संचालकावर गदा येणार आहे. त्यासाठी हा कायदाच रद्द करून धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा या साठी या टक्कर मोर्चाचे आयोजन केले आहे असे डांगे यांनी सांगितले. धनगड अन् धनगर हा एकच आहे, केवळ शब्दाचा खेळ असून जातीनिहाय जनगणनेत धनगर या समाजाचे नाव ३६ क्रमांकावर आहे असे असतानाही आरक्षण मिळत नाही. कारण धनगर समाजाचे खासदार-आमदार सरकारची डोकेदुखी करेल असे नाहीत. ज्या समाजाचे आमदार-खासदार अधिक त्यांचे प्रश्न धसास लागतात अन् आमचा समाज कोटीच्या घरात असून एकत्र येत नाही हे समाजाचे दुर्दैव आहे, असे सांगितले.