शहरातील रेल्वे स्थानकातून दररोज दुपारी तीन वाजता सुटणारी धर्माबाद एक्स्प्रेस १ जुलैपासून आठवडय़ातून केवळ बुधवार आणि शुक्रवार हे दोन दिवस करण्यात आली. परंतु रेल्वे प्रशासनाकडून यासंदर्भात कोणतीही माहिती जाहीर करण्यात न आल्याने स्थानकात एक्स्प्रेसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांची निराशा झाली आहे.
रोज दुपारी तीन वाजता मनमाड ते धर्माबाद ही गाडी धावत होती, तर दुपारी दोन वाजता ही गाडी धर्माबादहून मनमाडला येत होती. दुपारनंतर औरंगाबाद व मराठवाडय़ात जाण्यासाठी प्रवाशांना ही गाडी उपयुक्त होती. प्रामुख्याने मुंबईकडून येणारे प्रवासी याच गाडीने औरंगाबादकडे जात होते, परंतु १ जुलैपासून पुढील ६० दिवसांकरिता या गाडीचे वेळापत्रक बदलण्यात आले. ही गाडी आता बुधवार आणि शुक्रवार अशी धावणार आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे हा बदल करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले, या बदलाची सूचना फक्त तिकीट कार्यालयाजवळ चिकटविण्यात आली आहे. या बदलाची माहिती नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

Story img Loader