पाटबंधारे विभागाकडून कानउघडणी
तापी नदीवरील सुलवाडे प्रकल्पाचे दरवाजे बंद करावेत म्हणून आग्रह धरण्याऐवजी महानगरपालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रात किमान एक महिना पुरेल एवढे पाणी साठविण्यासाठी बंधारा किंवा तलाव स्वखर्चाने बांधावा असा सल्ला पाटबंधारे विभागाने दिला आहे. शहराच्या पाणीप्रश्नावर कायम बेफिकीर राहणाऱ्या महापालिका प्रशासनाची पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चांगलीच कानउघडणी केली असली तरी निर्ढावलेले पालिका प्रशासन ते कितपत मनावर घेते ते लगेच समजणे कठीण आहे.
तापी नदीवर असलेल्या सुलवाडे प्रकल्पाचे दरवाजे उघडल्यावर तापी पात्रातील ज्या ठिकाणाहून धुळे शहराला पाणी घ्यावे लागते तिथून पंपाद्वारे पाणी घेण्याची प्रक्रिया कटीण होते. पात्रात पाण्याची पातळी खालावल्याने पंपिंग करणे शक्य होत नाही. यामुळे ज्या तापी पाणी पुरवठा योजनेतून शहरासाठी मोठय़ा प्रमाणात पाणी आणले जाते ते येतच नाही. अशी गंभीर स्थिती उद्भवल्यानंतर नकाणे तलाव या एकमेव स्त्रोतावर ताण पडतो आणि जलशुद्धिकरण केंद्राची क्षमता अपुरी पडते. परिणामी शहरातील विविध वसाहतीतील पाणी पुरवठय़ाचे नियोजन कोलमडून पडते. असा अनुभव यंदाही धुळेकरांना घ्यावा लागला.
पावसाळा सुरू झाल्यावर हतनूर धरणात पाणी साचायला सुरुवात होते. या धरणाचे दरवाजे उघडले की पुढे सुलवाडे प्रकल्पाचेही दरवाजे उघडणे क्रमप्राप्त होते. पालिका प्रशासनाला कळविल्याशिवाय पाटबंधारे विभागाने प्रकल्पाचे दरवाजे उघडू नयेत असा आग्रह धरला जातो.
यासाठी थेट मंत्र्यांकडेही पत्रव्यवहार केला जातो. ही सर्व खटाटोप शहरवासियांची तहान भागविण्यासाठीच केली जात असली तरी महापालिकेने कायमस्वरूपी तोडगा काढणे अपेक्षित आहे.पाणी सोडण्याच्या या विषयावर पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांनाच पत्र देऊन महापालिकेची कानउघडणी केली आहे. तापी नदीतील पाणी जॅकवेलकडे न वळविता पालिका नेहमी दरवाजे बंद करावेत असा धोकादायक पर्याय सुचविते.सुलवाडे प्रकल्पाचे दरवाजे बंद करावेत हा महापालिकेचा आग्रह चुकीचा आहे. महापालिकेला हा सोपा पर्याय वाटत असला तरी पाणी घेण्यास अडचण येऊ नये म्हणून वाहून जाणारे पाणी वळविणे आवश्यक आहे. त्याविषयी जलसंपदा विभागाने पालिकेस वारंवार विनंतीही केली आहे. २०११ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या बैठकीतही बंधाऱ्याचे नियोजन करण्यासंदर्भात सूचित करण्यात आले होते.

Story img Loader