महापालिकेच्या वेगवेगळ्या चार व्यापारी संकुलांच्या बांधकामात बदल करावयाचा असल्याने सध्या या ठिकाणी असलेल्या व्यापाऱ्यांना आपले गाळे रिकामे करण्याची नोटीस महापालिका प्रशासनाने बजावली खरी, मात्र त्या विरोधात अनेक व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. ही प्रक्रिया न्यायप्रविष्ट झाल्यामुळे आता काही काळ तरी या संकुलांमध्ये व्यापार सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे. पर्यायी जागा देण्यावरून महापालिका व व्यापारी यांच्यात जुंपली आहे.व्यापारी संकुलात वर्षांनुवर्ष व्यवसाय करणाऱ्या किती व्यापाऱ्यांनी किती रक्कम महापालिकेकडे भरली आणि किती व्यापारी वसुलीला प्रतिसाद देतात याचे परीक्षण सुरू झाले आहे. महापालिकेचे पाच कंदील परिसरात शिवाजी मार्केट, शंकर मार्केट, लालबहादूर शास्त्री मार्केट, मनोहर चित्रपटगृहाजवळील धर्मशाळेजवळ व्यापारी संकुल आहेत. येथील व्यापाऱ्यांना ३० वर्षांच्या करारावर गाळे भाडय़ाने देण्यात आले आहेत. तसेच महापालिकेला जेव्हा वाटेल तेव्हा या जागांवर व्यापारी संकुल बांधताना हे गाळे खाली करण्याची अट टाकण्यात आली आहे. सर्वसाधारण सभेत या चारही ठिकाणी नवीन व्यापारी संकुल बांधण्याचा ठराव करण्यात आला. गाळेधारकांची मुदत संपल्याने शिवाजी जनरल मार्केट असोसिएशनच्या नावाने संकुले बांधण्याचा ठराव करण्यात आला. गाळेधारकांची मुदत संपल्याने शिवाजी जनरल मार्केट असोसिएशनच्या नावाने एक, लालबहादूर शास्त्री मार्केटमधील ३९ व मनोहर चित्रपट गृहाजवळील धर्मशाळेजवळील संकुलातील सहा अशा ४६ व्यापाऱ्यांना महिनाभरापूर्वीच नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यातील ४० व्यापाऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली. यामुळे नवे व्यापारी संकुल उभारण्याचा प्रयत्न तुर्तास तरी थांबविणे भाग पडले आहे. या संदर्भात न्यायालय काय निर्णय देते, यावर सारे काही अवलंबून राहणार आहे. महापालिकेचे शहरात एकूण २३ व्यापारी संकुल आहेत.
त्यात ५७२ गाळे तर १११ ओटे आहेत. हे गाळे व ओटे महापालिकेने तीन, सहा, सात, वीस व तीस वर्षांच्या भाडेतत्वावर व्यापाऱ्यांना दिली आहेत. दरवर्षी यातून महापालिकेला सुमारे ४० लाख २ हजार ७९६ रूपयांचे भाडे मिळते. गेल्या वर्षी ५९ लाख ८५ हजार ३२१ रूपये थकबाकी आणि ४० लाख दोन हजार ७९६ असे एकूण ९९ लाख ८८ हजार ११७ रूपयांची मागणी होती.
त्यातील ६९ लाख रूपये वसुली विभागाने वसूल केले होते. तर यंदा आतापर्यंत १० लाखांची वसुली करण्यात आली. महापालिकेने नोटीसा दिलेल्या शिवाजी मार्केटच्या कराराची मुदत ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी संपणार आहे.
पालिका बांधत असलेल्या व्यापारी संकुलांत ‘बीओटी’ तत्वावर गाळे दिले जाणार आहे. परंतु, संकुल पूर्ण होईपर्यंत पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. ही व्यवस्था व्यापाऱ्यांनी करावी असे महापालिकेचे म्हणणे आहे.