धुळे महापालिका निवडणूक
महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील युतीचा तिढा सुटला असून, जागा वाटप प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. शिवसेना ३६ तर भारतीय जनता पक्ष १८ जागा लढविणार आहेत. शिवसेनेने नवरात्रीचा मुहूर्त साधत नऊ उमेदवारांची यादी जाहीर करून अन्य पक्षांच्या तुलनेत आघाडी घेतली असली तरी उमेदवार निवडताना व जागा वाटपात कोणता निकष लावला, असा सवाल करीत एक गट नाराज झाला असून, या गटाने शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि महानगरप्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पुढील भूमिका ठरविण्यासाठी २० ऑक्टोबर रोजी मेळावा घेण्याचेही ठरविल्याने शिवसेनेत संपूर्ण यादी जाहीर होण्याआधीच बंडखोरीचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.
निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती राहणार हे याआधीच स्पष्ट झाले होते. जागा वाटपाबाबतचे धोरण निश्चित झाले असून, शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक २ (ब) राजेंद्र मराठे-थोरात, प्रभाग तीन (ब) देवीदास लोणारी, प्रभाग सहा (ब) भगवान गवळी, प्रभाग १३ (अ) वैशाली लहामगे (ब), संजय गुजराथी, प्रभाग ३३ (अ), सुवर्णा लष्कर, प्रभाग १९ (अ), संजय जाधव, (ब) सखूबाई जाधव, प्रभाग १० (अ), हिराबाई ठाकरे यांचा समावेश आहे.
शिवसेनेसाठी सोडण्यात आलेले प्रभाग पुढीलप्रमाणे- प्रभाग क्रमांक एक- दोन्ही जागा, क्रमांक दोन- पुरुष, तीन- दोन्ही जागा, चार- महिला, पाच- दोन्ही जागा, सहा- पुरुष, आठ- महिला, १०, ११, १२, १३, १५, १७, १८, १९, २६, ३०, ३३- या सर्वामध्ये दोन्ही जागा, १६, २०, २१- या सर्वामध्ये महिला, ३२-पुरुष.
भाजपसाठी सोडण्यात आलेले प्रभाग पुढीलप्रमाणे- प्रभाग क्रमांक दोन, सहा, ३२- सर्व महिला, चार, आठ १६, २०, २१- सर्व पुरुष, सात, नऊ, १४, २९, ३१- महिला व पुरुष दोन्हीही. या वेळी झालेल्या बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भाजप जिल्हाप्रमुख सुनील नेरकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख भूपेंद्र लहामगे, भाजपचे संघटनमंत्री भीमसिंग राजपूत, हिरामण गवळी आदी उपस्थित होते.
दरम्यान, घाईघाईने उमेदवार जाहीर करण्याचा फटका शिवसेनेला बसू लागल्याचे दिसत असून जागा वाटपाचा निकष काय, असा सवाल एका गटाने केला आहे. सध्या पालिकेत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. धुळे ग्रामीणमध्ये त्यांचा आमदारही आहे. साहजिकच पालिकेत केवळ तीन सदस्य असलेल्या भाजपच्या वाटय़ाला १८ जागा दिल्याच कशा, अशी विचारणा जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे आणि महानगरप्रमुख भूपेंद्र लहामगे यांना नाराज शिवसैनिक करू लागले आहेत. या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मर्जीतील आणि कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप करण्यात आल्याने शिवसेनेत सध्या दोन गट पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. वर्षांनुवर्षे ज्यांनी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावत उमेदवारांची पहिली नऊ जणांची यादी जाहीर करण्यात आली. महापौरपद महिला राखीव असल्याने पदाधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयातील महिलांना या पदाचे डोहाळे लागले असल्याचा जाहीर आरोप या गटाने केला आहे.
एखाद्या आंदोलनात पक्षाचा लढाऊबाणा दाखविणाऱ्या महिलांनाही उमेदवारी नाकारली जाते किंवा अवहेलना केली गेल्याने शिवसैनिकांनी नापसंती व्यक्त केली आहे. पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवू नये. असे पक्षाचे धोरण असताना जर नको ते घडत असेल तर २० ऑक्टोबरच्या मेळाव्यात पुढील निर्णय घेण्यात येईल, असा इशारा नाराज गटाने दिला आहे. शिवसेनेचे गटनेते आणि ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली आता हा नाराज गट एकवटला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षा मीनाताई बैसाणे यांनीही रिपब्लिकन पक्ष आणि शिवसेना कार्यकर्ते यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याचा आरोप केला.