अत्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करीत शिवसेना, काँग्रेस, लोकसंग्राम, भाजप या प्रमुख पक्षांना पराभूत केले. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या राष्टवादीने ७० पैकी तब्बल ३४ जागा स्वत:कडे राखताना सर्वच भागात मुसंडी मारली.
मतमोजणीला सकाळी येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात सुरूवात झाली आणि मोजणीच्या फेऱ्या ज्याप्रमाणे पुढे सरकत गेल्या तशी राजकीय गणिते बदलत गेली.  पहिल्या आणि दुसऱ्या फेऱ्यांनंतर राष्ट्रवादी ११, शिवसेना ११, अपक्ष ६, काँग्रेस ४, भाजप ३, समाजवादी २ आणि लोकसंग्राम १ अशी आघाडी होती. तर तिसऱ्या फेरीअखेर आकडेवारी बदलली. राष्ट्रवादी १४, शिवसेना ८, अपक्ष ७, काँग्रेस ५, समाजवादी २, भाजप ३ आणि लोकसंग्राम १ अशी अदलाबदल झाली. सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीमुळे शहरात कमालीचा तणाव पाहावयास मिळाला. सकाळपासूनच शहरातील पेठ आणि आझादनगर पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या परिसरात अफवा पसरविण्याचे काम सुरू झाले होते. पेठ परिसरात तर दुपारी १२ वाजेपर्यंत सन्नाटा पसरला होता.
कामगार व कष्टकरी वर्गाची सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या मिल परिसरातील प्रभाग ३०, ३१ आणि ३३ मध्ये राष्ट्रवादीचे एकूण पाच उमेदवार मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले. माजी महापौर मोहन नवले यांनी या परिसरातील आपला दबदबा अद्याप कायम असल्याचे दाखवून दिले. प्रभाग ३१ मधून शशिकला मोहन नवले आणि अमोल उर्फ बंटी मासुळे विजयी झाले. तर प्रभाग ३० मध्ये संदीप पाटोळे आणि यमुना जाधव यांनी शिवसेनेचे तुषार पाटील आणि सुमनबाई जाधव यांना पराभूत केले.माजी स्थायी समिती सभापती सतीश महाले यांनीही प्रभाग ३३ मधून विजय संपादन केला. या प्रभागातून महाले यांचे समर्थक प्रविण अग्रवाल यांच्या पत्नी सारिका अग्रवाल अपक्ष म्हणून विजयी झाल्या. प्रभाग ३२ मध्ये सुभाष उर्फ दादा खताळ आणि माधुरी अजळकर हे अपक्ष उमेदवार विजयी झाले.
शहरातील फुलवाला चौक, नगरपट्टी, जुने अमळनेर स्थानक, पारोळारोड, सराफ बाजार या पेठ विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील प्रभाग १३ मध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. विरोधी पक्षनेते संजय गुजराथी आणि महानगरप्रमुख भूपेंद्र लहामगे यांच्या पत्नी वैशाली लहांमगे यांनी दणदणीत विजय मिळवला. आमदार अनिल गोटे यांच्या पत्नी  हेमाताई गोटे, राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक अनिल मुंदडा हे पराभूत झाले.
या विजयामुळे भगवा चौक या बालेकिल्यात भगव्याचा दबदबा कायम राहिला असला तरी जुने धुळे विभागात सेनेच्या वर्चस्वाला धक्का बसला. प्रभाग १० व १२ मधील चारपैकी राष्टवादीने दोन तर एक अपक्ष आणि शिवसेनेला एकच जागा मिळाली. प्रभाग १० अ मधून शिवसेनेच्या हिराबाई ठाकरे विजयी झाल्या. १० ब मध्ये अपक्ष गुलाब महाजन, प्रभाग १२ मधून राष्ट्रवादीचे चंद्रकांत सोनार, १२ अ मधून राष्ट्रवादीच्या ललिता आघाव विजयी झाले.