शहराची तहान भागविण्यासाठी अनेक वर्षांपासून सहकार्याचा हात पुढे करणाऱ्या साक्रीकरांनी यंदा पाणी न देण्याची भूमिका का घेतली, याविषयी प्रशासन आणि राजकारण्यांवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. धुळ्याची तहान पुरविण्यासाठी कायमस्वरूपी कोणतीही योजना न राबविण्याचा बेफिकीरपणा यापुढे आणखी किती वर्षे चालणार, असा सवाल धुळेकरांनी केला आहे.
यंदा धुळे, शिंदखेडा आणि शिरपूरच्या तुलनेत साक्री तालुक्यात अतिशय कमी म्हणजे केवळ १८० मिलीमीटर पाऊस झाला. यामुळेच यंदा साक्रीकरांनी धुळ्यास पाणी देण्यास विरोध करीत ‘साक्री तालुका पाणी बचाव संघर्ष समिती’ स्थापन केली आहे. प्रारंभी ग्रामस्थांच्या सहभागातून आकाराला आलेली ही समिती प्रशासनाच्या निर्णयापुढे सहज नमते घेईल, असे सर्वाना वाटत होते. परंतु समितीच्या ‘पाणी बचाव’ भूमिकेशी संपूर्ण तालुका एकवटला आहे. पाणी राखण्यासाठी सतत होणाऱ्या बैठका आणि भाषण-विचारांमधून व्यक्त होणारे पाण्याचे महत्त्व, यामुळे धुळ्यासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठय़ाची व्यवस्था करणे किती गरजेचे आहे, हे दिसून येते. प्रत्येक वक्ता साक्री येथे भाषण ठोकताना धुळेकरांना पाणी द्यायचे नाही, हे मत मांडत आहे. तरीही धुळ्याची टंचाई कायमस्वरूपी दूर होईल, अशी कोणतीच योजना प्रशासकीय पातळीवर चर्चेत येत नाही, हे दुर्दैव आहे. तापीकाठी वसलेला शिरपूर तालुका सिंचनाच्या बाबतीत समाधानी असताना शेजारच्या शिंदखेडय़ातील काही गावांत तापी नदी शेजारी असूनही पिण्याचे पाणी मिळत नाही. धुळ्याची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. दूरदृष्टी नसलेल्या आतापर्यंतच्या राजकीय नेतृत्वावर या अपयशाचे खापर फोडले जात आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा