अल्पवयीन बालिकेचे तब्बल अडीच महिने लैंगिक शोषण करणाऱ्या संशयितांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी शहरातील महिला संघटना रस्त्यावर उतरल्या असताना एरवी छोटय़ा छोटय़ा कारणांसाठी पत्रक काढणारे पत्रकबाज लोकप्रतिनिधी कुठे गेले आहेत, असा प्रश्न धुळेकरांसमोर आहे.
निवडणुकीच्या प्रचारात धुळे शहर गुन्हेगारीमुक्त करण्याची ग्वाही देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खरे तर या प्रकरणातील सर्व संशयितांना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधींनी आंदोलन करावयास हवे होते, अशी धुळेकरांची अपेक्षा आहे. शहरातील गुन्हेगारीत कमालीची वाढ झाली असून, पोलिसांचा कोणालाही धाक उरलेला नाही. मंगळसूत्र खेचून नेणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.
या अशा घटना रोखण्यासाठी आणि पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात आवाज उठविण्यासाठी शहराचे आमदार जर पुढाकार घेत नसतील तर त्यांचा काय उपयोग, असा सवाल केला जात आहे.

Story img Loader