उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांची केवळ कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत जाण्याची सोय करणाऱ्या विभागाने पाटणा-कुर्ला ही गाडी थेट छत्रपती शिवाजी टर्मिनन्सपर्यंत नेऊन विशिष्ट प्रदेशातील प्रवाशांविषयी कमालीची आपुलकी दाखविली आहे. पाटणा-कुर्ला गाडी जर छत्रपती शिवाजी टर्मिनन्सपर्यंत जात असेल तर अमृतसर- कुर्ला का नाही, असा सवाल केला जात आहे. मुंबईपर्यंतची रेल्वेसेवा धुळ्याहून देण्याची मागणीही करण्यात येत आहे.
तांत्रिक किंवा वाहतुकीची कोणतीही अडचण न दाखविता पाटणा-कुर्ला गाडीची ज्याप्रमाणे सोय बघितली जाते. त्याप्रमाणे इतर गाडय़ांनाही हिरवा झेंडा दाखविण्याची गरज आहे. मनमाडहून रोज सकाळी सहा वाजून १० मिनिटांनी सुटणारी पंचवटी एक्स्प्रेस मुंबईत १० वाजून ४५ मिनिटांनी पोहोचते. हीच गाडी मुंबईहून सायंकाळी सहा वाजून १५ मिनिटांनी सुटते. १० वाजून ५० मिनिटांनी मनमाड येथे पोहोचते.
मनमाड-कुर्ला एलटीटी एक्स्प्रेस मनमाडहून आठ वाजून ३५ मिनिटाला निघून कुर्ला येथे दुपारी एक वाजता पोहोचते. ही गाडी कुल्र्याहून दुपारी तीन वाजता निघून सायंकाळी सात वाजून २५ मिनिटांनी मनमाडला पोहोचते. मनमाडहून मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ांची वेळ देण्यामागील कारण हेच की, या गाडय़ा जर मनमाडऐवजी धुळ्याहून निघाल्या आणि परत धुळ्याकडे आल्या तर धुळेकरांचे मुंबई गाडीचे स्वप्न साकार होऊ शकेल. पहाटे मुंबईला जाणारा प्रवासी सर्व कामे आटोपून सायंकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत पुन्हा धुळ्यात परतू शकेल.
धुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे एकंदर बळ पाहता धुळे-मुंबई गाडीचे स्वप्न कधी पूर्ण होईल ते सांगता येणे मुश्किल आहे. त्यामुळेच मनमाडहून सुटणाऱ्या गाडय़ा धुळ्याहून सोडण्यात जरी यश आले तरी खूप काही साध्य केल्यासारखे होऊ शकेल. त्यासाठी भले लोहमार्ग दुहेरी करावा.
कमी लांबीच्या या रेल्वेमार्गाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठे समाधान मिळू शकेल. धुळे-मुंबई रेल्वेसेवा नसल्याने प्रशासन मोठय़ा आर्थिक उत्पन्नापासून वंचित राहात आहे. मुंबईकडे जा-ये करणाऱ्या खासगी बस सेवेला मिळणारा प्रतिसाद बघता आर्थिक फायद्याचा अंदाज सहज बांधता येऊ शकेल.
धुळे ते चाळीसगाव पर्यंतच्या रेल्वे प्रवासाचे अंतर ५६ किलोमीटर असून सद्यस्थितीतील पॅसेंजर गाडीने एक तास १५ मिनिटे इतका वेळ लागतो.
चाळीसगाव ते मनमाड हे अंतर ६८ किलोमीटर असून हे अंतर कापण्यासाठी एक्स्प्रेस गाडीला ५३ मिनिटे लागतात. त्यामुळेच एकंदर आढावा घेतल्यास मुंबईपर्यंतची रेल्वेसेवा धुळ्याहून दिल्यास फायदेशीर ठरू शकते हेच दिसून येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा