शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पामुळे धुळे शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटल्याचा दावा जलसंपदा विभागाने श्वेतपत्रिकेत केला असला तरी सद्यस्थितीत या ठिकाणी तीन दिवसाआड पाणी पुरवठा होतो, यावरून वास्तव लक्षात येऊ शकते. सुलवाडे प्रमाणेच तालुक्यातील वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्पाची किंमत २३० कोटींनी वाढली असून कालव्यांची कामे अद्यापही सुरू आहेत.
सुलवाडे बॅरेज प्रकल्पास १९९२ मध्ये मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यावेळी त्याची ४२.०२ कोटी असणारी किंमत वाढत वाढत २९०.८८ कोटींवर जाऊन पोहोचली. आतापर्यंत या प्रकल्पावर २१९.६९ कोटी रूपये खर्च झाले असून भूसंपादन, पुनर्वसन वनजमीन संपादनाची कामे पूर्ण झाल्याचे श्वेतपत्रिकेत म्हटले आहे. धरणाचे काम पूर्ण झाले असून ६५.०६ दशलक्ष घनमीटर जलसाठा क्षमता निर्माण झाली आहे. प्रकल्पाची सिंचन क्षमता ८५८२ हेक्टर निर्माण झाली आहे. बॅरेजच्या दोन्ही तिरांसाठी वैयक्तिक उपसा सिंचनाद्वारे ७६० हेक्टर क्षेत्रास परवानगी देण्यात आली आहे. ५१५२ हेक्टर क्षेत्र विहीर व बोअरद्वारे सिंचित होत आहे. धुळे शहराला पाणी पुरवठा करण्याचा उद्देशही या प्रकल्पामागे होता. सद्यस्थितीत धुळे शहराची लोकसंख्या साडे चार लाखहून अधिक आहे. त्यामुळे या प्रकल्पातून धुळे शहर, नरडाणा व नऊ गांवे, म्हळसर व दोन गावे, मुळावद या गावांसाठी १७.२७ दशलक्ष घनमीटर व नरडाणा औद्योगिक विकास महामंडळासाठी तसेच शिरपूर औष्णिक विद्युत केंद्रासाठी १४.३८ दशलक्ष घनमीटर अशी एकूण ३१.६५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे.
२००० – २००१ मध्ये उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे धुळे शहरात आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पामुळे धुळे शहराचा पाणी पुरवठा कायमस्वरूपी सुटल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे. धुळे शहराला उन्हाळा तर सोडाच, पण सध्या हिवाळ्यात तीन दिवसाआड होणारा पाणी पुरवठा लक्षात घेतला तरी या प्रकल्पाचा कितपत लाभ झाला ते लक्षात येईल. सध्या धुळे महापालिका तापीतून पाणी उचलत आहे. काही दिवसांपूर्वी धुळे शहराला पाणी देण्यावरून साक्रीकरांच्या विरोधामुळे राजकीय वादंग घडल्याचे पहावयास मिळाले होते. या स्थितीत उपरोक्त प्रकल्पाने धुळेकरांचा पाणी प्रश्न पूर्णपणे सुटल्याच्या दाव्यात कितपत तथ्य आहे, ते लक्षात येईल. शिरपूर औष्णिक वीज प्रकल्पाच्या माध्यमातून जलसंपदा विभागास १६.८२ कोटीचा निधीही प्राप्त झाला. तसेच केंद्रीय जलसंपदा आयोगाच्या मंजुरीमुळे एआयबीपी अंतर्गत ८८ कोटीचे अर्थसहाय्य मंजूर झाले.
प्रारंभीच्या काळात पुरेसा निधी नसल्याने प्रकल्पाचा कालावधी १० वर्षांनी लांबला आणि किंमतीत मोठी वाढ झाली. शिंदखेडा तालुक्यातील वाडी शेवाडी प्रकल्पाची वेगळी स्थिती नाही. या प्रकल्पातील माती धरण, सांडवा, पस्तंभ, द्वारनिर्मिती व उभारणीची कामे पूर्णत्वास गेली आहेत. परंतु, उजव्या कालव्याचे काम प्रगतीपथावर असून ते ५० टक्के बाकी आहे. निधी मिळत नसल्याने या प्रकल्पाचे काम रखडून किंमत लक्षणिय वाढली. बुडीत क्षेत्रातील वाडी व दिवीच्या प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे चार वर्ष विलंब झाला. प्रकल्पाचा एकूण जलसाठा क्षमता ३६.९३ दशलक्ष घनमीटर असून २००९-१० मध्ये १०० हेक्टर प्रत्यक्ष सिंचन झाले आहे. जमीन व प्रकल्पग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे सुमारे ७७ कोटी, प्रकल्प खर्चातील वाढीमुळे ३२ कोटी व संकल्प चित्रातील वाढीमुळे सहा कोटीचा बोजा पडल्याचे श्वेतपत्रिकेत म्हटले आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा