भारतात दररोज ७३ हजार ४४० नवीन बालके जन्माला येतात, मात्र त्यापेक्षा अधिक मधुमेहाच्या रुग्णांची वाढ होते. त्यामुळे मधुमेहासंबंधी लोकजागृती आवश्यक असल्याचे मत मधुमेहतज्ज्ञ डॉ. हमीद चौधरी यांनी व्यक्त केले.
१४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेहदिनाचे निमित्त साधून लातूर शहरात जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहेत. त्यानिमित्त आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. या प्रसंगी आयएमएचे अध्यक्ष डॉ. परमेश्वर सूर्यवंशी, डॉ. चंद्रकांत रायभोगे, डॉ. ईश्वर राठोड, डॉ. गोपीकिशन भराडिया, डॉ. गजानन गोंधळी उपस्थित होते.
भारतात सर्वात जुना आजार म्हणून मधुमेह आहे. यावर उपचाराच्या अनेक पद्धती विकसित झाल्या. मात्र हा आजार पूर्णपणे उखडून टाकण्याचे संशोधन अद्याप झाले नसल्याचे डॉ. चौधरी म्हणाले. भारत ही मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखले जाते. व्यायामाचा अभाव, संतुलित आहार न घेणे ही मधुमेहवाढीची कारणे असल्याचे डॉ. गोपीकिशन भराडिया यांनी सांगितले. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील गांधी चौकातून गंजगोलाई, मार्केट यार्ड आदी भागांत जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात डॉक्टर्स, नस्रेस, फार्मासिस्ट, वैद्यकीय महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
१७ नोव्हेंबर रोजी दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता मधुमेहाविषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात डॉ. हमीद चौधरी, डॉ. ईश्वर राठोड व डॉ. गोपीकिशन भराडिया हे सहभागी होणार आहेत. नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diabetes increasing at higher rate than birth rate dr chaudhary