मधुमेह केवळ साखरेचाच आजार नसून इतरही अनेक विकार त्याच्याशी निगडित असल्याचे प्रतिपादन विविध मधुमेहतज्ज्ञांनी केले. निमित्त होते जागतिक मधुमेहदिनी आयोजित चर्चासत्राचे. विवेकानंद रुग्णालय, एम. जे. रुग्णालय व लातूर अतिदक्षता विभाग यांच्या वतीने दयानंद सभागृहात हा कार्यक्रम झाला. गोपीकिशन भराडिया, ईश्वर राठोड, हमीद चौधरी व चंद्रकांत रायभोगे या डॉक्टरांनी यात मार्गदर्शन केले. मानवी जीवनात झपाटय़ाने होणारे बदल, त्यामुळेच वाढणारा लठ्ठपणा, इन्शुलिनची अकार्यक्षमता यामुळेच मधुमेहींची संख्या देशात जन्मदरापेक्षा जास्त गतीने वाढत आहे. मधुमेहामुळे हृदयरोग, रक्तदाब, मूत्रिपडाचे आजार व आंधळेपणाचे प्रमाण वाढत आहे, याकडेही तज्ज्ञांनी चिंता व्यक्त करून लक्ष वेधले. मधुमेहामध्ये साखरेचे प्रमाण वाढत असले, तरी याशिवाय चरबीचे प्रमाण वाढणे, चरबीचे स्वरूप बदलणे, बारीक व मोठय़ा रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम, हृदय व यकृताभोवती चरबी तयार होणे आदी घातक विकार साखरेच्या वाढीशिवाय आढळतात. त्यामुळेच कित्येक वेळा रक्तातील साखर तेवढी वाढली नसतानाही मधुमेहपूर्व स्थितीत हृदयविकाराचा झटका येतो किंवा इतर गुंतागुंत वाढते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्रीकांत गोरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी एमआयटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बसवराज नागोबा होते. डॉ. डी. एन. चिंते, प्राचार्य डॉ. मंजूषा भुजबळ उपस्थित होते. आयएमएचे अध्यक्ष डॉ. परमेश्वर सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. गिरीश कोरे यांनी केले. डॉ. गजानन गोंधळी यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा