आहार व्यवस्थापन ही आधुनिक काळाची गरज असून याविषयी माहिती देणाऱ्या पुस्तकांचा समावेश शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात केला गेला पाहिजे, असे प्रतिपादन अभिनेते परेश रावल यांनी नुकतेच मुलुंड येथे केले.
डॉ. सरिता डावरे आणि शेफ संजीव कपूर यांनी लिहिलेल्या ‘द लिव्ह वेल डाएट’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. महाराष्ट्र सेवा संघ संचालित न. चिं. केळकर आणि पॉप्युलर प्रकाशन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमात रावल आणि गायक हरिहरन यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी रावल बोलत होते.
आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यानंतर डाएटकडे वळण्याऐवजी त्याची सुरुवात जर आधीपासूनच झाली तर त्याचा नव्या पिढीला खूप फायदा होईल, असा विश्वासही रावल यांनी या वेळी व्यक्त केला. प्रकाशक हर्ष भटकळ म्हणाले की, या पुस्तकाच्या माध्यमातून आहारविषयक सर्व समज-गैरसमज दूर होण्यास नक्कीच मदत होईल.
तर लेखिका डॉ. डावरे म्हणाल्या की, आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा पाश्चात्य वैद्यकीय पद्धतीशी मेळ घालून निरोगी जीवनशैलीसाठी निर्माण केलेली उपचार आणि आहार पद्धती या पुस्तकाचा गाभा आहे. हरिहरन यांनीही डाएटविषयी आपला अनुभव यावेळी सांगितला.

Story img Loader