जालना शहरात सांस्कृतिक-साहित्यिक कार्यक्रमांच्या आयोजनात पुढाकार घेणाऱ्यांमध्ये प्रा. जयराम खेडेकर यांचे नाव आघाडीवर असते. कवी असलेले प्रा. खेडेकर इतर साहित्यिकांना पुरस्कारांनी गौरविण्यातही आघाडीवर असतात. त्यांच्या ‘मेघवृष्टी’ काव्यसंग्रहास राज्य सरकारचा बालकवी साहित्य पुरस्कार मिळाला आहे. ‘ऋतुवंत’ हा त्यांचा आणखी एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. ‘ऋतुवंत’ काव्यसंग्रहासही शिवार प्रतिष्ठानचा ‘संत जनाबाई पुरस्कार’ मिळाला. अनेक व्यासपीठांवरून काव्यवाचन करणारे प्रा. खेडेकर ‘ऊर्मी’ या नावाचे साहित्यविषयक द्वैमासिकही प्रकाशित करतात. साहित्यविषयक चळवळही चालवितात.
जालना शहरातील विनीत साहनी व नवल साहनी यांच्या सहकार्याने ते दरवर्षी दिवंगत उर्दू कवी राय हरिश्चंद्र साहनी ऊर्फ ‘दु:खी’ यांच्या स्मृत्यर्थ एका मराठी कवीस पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आयोजित करतात. अलीकडेच हा पुरस्कार प्रसिद्ध कवयित्री गिरिजा यांना देण्यात आला. दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी ‘कवितेचा पाडवा’ साजरा करून त्यासाठी विविध नामवंत साहित्यिक, कलाकारांना ते आमंत्रित करतात. त्यामुळे जालना शहरवासीयांना साहित्यविषयक कार्यक्रमांचा आनंद घेण्याची संधी मिळते. यामुळेच प्रा. खेडेकर यांचे कवी साहित्यिक म्हणून जसे महत्त्व आहे, तसेच विविध साहित्यिक कार्यक्रम आयोजित करणारे म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत.
जालना तालुक्यातील शिवणी हे त्यांचे मूळ गाव. जालना शहरात वास्तव्य असतानाही आपल्या गावाचा विसर त्यांना पडला नाही. शिवणी गावात कार्यक्रम आयोजित करून ‘शेती-पाणी’ या विषयावरील लिखाणासाठी पुरस्कार देण्यात त्यांचा पुढाकार असतो. शिवणी गावात प्रसिद्ध कवी ना. धों. महानोर यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याची कल्पना प्रा. खेडेकर यांचीच. पाणी, माती, हवा यांच्याशी नाते सांगणाऱ्या महानोर यांच्यासारख्य़ा कवीबद्दलची कृतज्ञता त्यांनी अशा प्रकारे व्यक्त केली आहे. यापूर्वी त्यांनी ‘ऊर्मी साहित्य प्रतिष्ठान’च्या वतीने जालना जिल्हा पातळीवरील साहित्य संमेलनही आयोजित केले आहे.
प्रा. खेडेकर यांच्या पुढाकाराने जालना शहरात साहित्यिकांना आणखी तीन-चार पुरस्कार देण्यात येतात. वर्षभरात या निमित्ताने पाच-सहा साहित्यिक कार्यक्रम होतात. याशिवाय विविध ठिकाणी कवी संमेलनेही आयोजित करण्यात त्यांचा पुढाकार असतो. स्वत: कवी असून इतर कवी साहित्यिकांचा गौरव व्हावा, यासाठी त्यांची धडपड चालू असते.
ग्रामीण भूमीशी घट्ट नाते जोडून असणारे प्रा. खेडेकर आपल्या कवितांमधून अस्सल जीवनानुभव मांडतात. जालना जिल्ह्य़ातील शिवणीसारख्या डोंगराळ भागातून आलेल्या प्रा. खेडेकर यांच्या कवितांना कृषी संस्कृतीचा संदर्भ असतो. ग्रामीण जनजीवनातील कष्टांचे संदर्भ असलेल्या त्यांच्या कविता आपले वेगळेपण दाखवितात. त्यामुळेच ते म्हणतात की, ‘कसे सांगू मी तुम्हाला जोडताना मोडले काही, त्यांनी कवटाळले आभाळ मी मातीला सोडले नाही!’ विविध पुरस्कार वितरणच्या निमित्ताने त्यांच्या पुढाकाराने पाच-सहा कार्यक्रम आयोजित होत असल्याने जालना शहरातील साहित्य चळवळीस गती मिळण्यास मदत होत आहे. ग्रामीण कष्टकऱ्यांच्या जीवनातील उदासपणा व त्यांच्या खडतर जीवनातील प्रसंग शब्दबद्ध करणारे प्रा. खेडेकर साहित्यविषयक कार्यक्रमाच्या आयोजनातही पुढे असतात.
‘त्यांनी कवटाळले आभाळ, मी मातीला सोडले नाही’!
जालना शहरात सांस्कृतिक-साहित्यिक कार्यक्रमांच्या आयोजनात पुढाकार घेणाऱ्यांमध्ये प्रा. जयराम खेडेकर यांचे नाव आघाडीवर असते. कवी असलेले प्रा. खेडेकर इतर साहित्यिकांना पुरस्कारांनी गौरविण्यातही आघाडीवर असतात. त्यांच्या ‘मेघवृष्टी’ काव्यसंग्रहास राज्य सरकारचा बालकवी साहित्य पुरस्कार मिळाला आहे.
आणखी वाचा
First published on: 04-05-2013 at 12:11 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different award ceremony held in jalna cause in cultural movement growth in city