मराठी रंगभूमीवर सध्या पुनरुज्जीवित नाटके एकामागोमाग येत असतानाच्या पाश्र्वभूमीवर वेगळ्या प्रयोगाचे ‘सोबत संगत’ हे नाटक सादर झाले आहे. या नाटकाचे वैशिष्टय़ आणि वेगळेपण म्हणजे या एकाच नाटकात एका संकल्पनेवर आधारित चार कथांचे सादरीकरण पाहायला मिळणार आहे.
एकमेकांना दिलेली जीवाभावाची साथ, मैत्री आणि नाते या संकल्पनेवर आधारित चार कथांच्या माध्यमातून हे नाटक उलगडत जाते. ऐश्वर्या आर्ट्स अ‍ॅण्ड थिएटर’, ‘वेदांत आर्ट अ‍ॅण्ड एन्टरटेंटमेंट सहयोग’ यांची संयुक्त निर्मिती असलेल्या या नाटकाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी हिने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांच्या नाटकात प्रमुख भूमिका आहेत. सध्या मराठी रंगभूमीवर जुनी नाटके सादर करण्याचा कल असताना नारकर दाम्पत्याने हे नवे आणि वेगळ्या प्रयोगाचे नाटक रंगभूमीवर आणले आहे. इतकेच नव्हे तर अभिनेत्री असलेल्या संपदा जोगळेकर-कुलकर्णी हिच्यावर  नाटकाचे दिग्दर्शन व लेखक म्हणून जबाबदारी देऊन विश्वासही दाखविला आहे. नाटकातील गाणीही संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांची आहेत.
‘सोबत संगत’मध्ये चार गोष्टी असल्या तरी या चार गोष्टींमध्ये एक वेगळी मजा आहे. या नाटकाच्या जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे हे नाटक म्हणजे ‘मराठी रंगभूमीवर पिझ्झाची पंगत’ आहे. ऐश्वर्या नारकर व स्वप्नील गोखले नाटकाचे निर्माते आहेत.
‘सोबत संगत’ या नाटकाने परदेशात शुभारंभाचा प्रयोग करण्याचा मानही मिळविला आहे. नाटकाचा पहिला प्रयोग नुकताच दुबई येथे झाला. दुबईतील मराठी नाटय़ रसिकांनी या नाटकाची तालीम पाहून दुबईत हे नाटक करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे नाटकाचा प्रारंभ दुबईत झाला.

Story img Loader