शहरासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतंर्गत विविध कार्यक्रमांच्या आयोजनास सुरूवात झाली आहे. काही महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबीर, कुठे विद्यार्थी कल्याण मंडळाचे उद्घाटन तर, कुठे राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापन दिन असे कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व पटवून देण्यात आले.
सावंत महाविद्यालयात रक्तदान शिबीर
नाशिक येथील पाथर्डी फाटय़ावरील जी. डी. सावंत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत अर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. ए. डी. बांदल, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी टी. आय. पठाण, उपप्राचार्य प्रा. के. व्ही. शेंडे, अर्पण रक्तपेढीचे समन्वयक डॉ. नितीन जैन आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. डी. शेंडगे आदी उपस्थित होते. प्रा. शेंडगे यांनी प्रास्तविकात कार्यक्रम आयोजित करण्यामागील हेतू स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बांदल यांनी भारताला आज तरुणांची खरी गरज असून तेच आपले खरे हिरो असल्याचे सांगितले. असे असले तरी तरुणांची दिशा चुकत आहे. कारण ते सामाजिक ऋण विसरले आहेत. ती सामाजिक उत्तरदायित्व फेडण्याची सुवर्णसंधी राष्ट्रीय सेवा योजनेने उपलब्ध करून दिली आहे. आपले रक्त कोणाचा तरी जीव वाचवू शकते. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबीरात सहभाग घेण्याचे आवाहन प्राचार्यानी केले. सूत्रसंचालन प्रा. एस. सी. निकम यांनी केले. आभार प्रा. एम. डी. शेंडगे यांनी मानले.
वाध महाविद्यालयात ‘रासेयो’ उद्घाटन
काकासाहेबनगर येथील क. का. वाघ महाविद्यालयात डॉ. जयदीप निकम यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. एस. शिरसाठ हे होते. कार्यक्रमास रामनाथ पानगव्हाणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. निकम यांनी नववैश्विक रचनेत भारताचे स्थान, अमेरिकेच्या विकासामध्ये भारतीय युवकांचे योगदान यावर भाष्य केले. युवकांना जगातील विविध देशात आपल्या ज्ञानसत्तेच्या बळावर अधिसत्ता गाजविण्याची संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. प्राचार्य शिरसाठ यांनी युवकांना सामाजिक उतरदायित्वाचे महत्व पटवून दिले. डॉ. निकम व त्यांच्या मैत्रीपूर्ण आठवणींना उजाळा दिला. प्रास्तविक प्रा. एस. आर. पावडे आणि प्रा. पी. डी. गोणारकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रियंका भालेराव व सविता कुशारे यांनी केले.
वावरे महाविद्यालयात ‘रासेयो’ वर्धापनदिन साजरा
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सिडको येथील कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ होते. प्राचार्य डॉ. वाघ यांनी विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादन करताना समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले. जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास अंगी बाळगल्यास जीवनात यशस्वी होता येते. माणुसकी धर्म, चांगले संस्कार समनिष्ठा व स्वच्छता या गुणांचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना एक उत्तम माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. डी. आर. बच्छाव, प्रा. बी. पी. कुटे, प्रा. एस. बी. भिसे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. एस. टी. घुले यांनी योजनेचा इतिहास स्पष्ट करून वर्धापन दिनाविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास, नेतृत्व गुण व समाजाचे ऋण या योजनेच्या माध्यमातून व्यक्त केले जाते, असेही त्यांनी सांगितले. योजनेच्या सप्ताहात मुलींसाठी स्वसंरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य जागर, गांधी विचार या विषयांवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी डॉ. जयश्री जाधव यांनी ‘पराक्रमी युवक-अनंत कान्हेरे’ या विषयावर व्याख्यान दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. सूत्रसंचालन अश्विनी पाटील यांनी केले. आभार दुर्गा महाले हिने मानले.
राष्ट्रीय सेवा योजनेअंतंर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रम
शहरासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतंर्गत विविध कार्यक्रमांच्या आयोजनास सुरूवात झाली आहे. काही महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबीर, कुठे विद्यार्थी कल्याण मंडळाचे उद्घाटन तर, कुठे राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापन दिन असे कार्यक्रम झाले.
आणखी वाचा
First published on: 26-09-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different programs held under the national service scheme