माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. गंगापूर रस्त्यावरील समर्थ महिला मंडळातर्फे यंदाही २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत आनंद मेळा होणार असून, भाजप मध्य पश्चिम मंडलतर्फे २५ डिसेंबर रोजी मोफत नेत्ररोग चिकित्सा आणि मधुमेह निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
गंगापूर रस्त्यावरील पूर्णवादनगरमध्ये प्रसाद मंगल कार्यालयाजवळील पारनेरकर महाराज सभागृहात भाजपच्या मध्य पश्चिम मंडलचे सरचिटणीस देवदत्त जोशी यांच्या वतीने गुरुवारी मोफत नेत्ररोग चिकित्सा व मधुमेह निदान शिबीर होणार आहे. सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत होणाऱ्या या शिबिरास श्रीगुरुजी रुग्णालयाचे सहकार्य असून धनंजय देशमुख, हर्षल पिळोदेकर, नितीन जाधव हे डॉक्टर तपासणी करणार आहेत. शिबिराचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन देवदत्त जोशी यांनी केले आहे.
आ. सीमा हिरे यांच्या समर्थ महिला मंडळातर्फे दरवर्षी प्रसाद मंगल कार्यालयाजवळील मैदानात अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवशी आनंद मेळा आयोजित करण्यात येत असतो. गृहिणींनी, गृहिणींसाठी आयोजित केलेल्या या मेळ्यानिमित्त अनेक घरगुती आणि लघुउद्योग करणाऱ्या महिलांसाठी बाजारपेठ उपलब्ध होते. दरवर्षी आनंद मेळ्यास परिसरातील ३५ ते ४० हजार
नागरिक थेट देत असतात. मेळ्यात गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे, गृह सजावटीच्या वस्तू तसेच बालगोपाळांसाठी विविध करमणुकीचे खेळ यांचा समावेश असतो. २६ डिसेंबर रोजी मेळ्याचे उद्घाटन व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ होईल. २७ डिसेंबर रोजी दौलत भट यांचा कठपुतळी शो, तर २८ डिसेंबर रोजी प्रसिद्ध गायक सलीम यांचा नवीन व जुन्या गाण्यांचा कार्यक्रम होईल. दुपारी चार ते १० पर्यंत आनंद मेळ्यास भेट देण्याचे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा सीमा हिरे यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.