सर्वसाधारणपणे लग्न जमवताना मुलामुलीचं शिक्षण, नोकरी, हुद्दा या गोष्टी पाहिल्या जातात. पण, आमच्या आयुष्यात म्हणावं तसं शिक्षण, नोकरी आणि करिअर घडलं ते लग्नानंतर. किंबहुना आम्हा पतीपत्नीनं परिस्थितीशी झगडून ते मिळविलं. एरवी ही परिस्थिती ओढवली नसती. पण वयाच्या १७ व्या वर्षी घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केल्यानंतर तर ही वेळ येणार, हे तसं अपरिहार्यच होतं.
आमच्या या ‘प्रेमाच्या गोष्टी’ला सुरुवात झाली ३३ वर्षांपूर्वी.. उल्हासनगरच्या चांदीबाई महाविद्यालयात बीएच्या पहिल्या वर्षांला असताना उषाशी ओळख झाली. ती माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी. कॉलेजच्या सीआरच्या निवडणुकांमध्ये तिनं खूप मदत केली. मी शब्दांमध्ये रमणारा आणि वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमात सक्रिय.. कॉलेजमध्ये बऱ्यापैकी प्रसिद्ध. निवडून आलो, पण मित्रांना पार्टी द्यायलाही खिशात पैसे नव्हते. तिनं तिच्याकडचे २५ रुपये पुढे केले, आणि मी सर्वाना वडापावची पार्टी दिली. त्या क्षणी, तिनं पुढे केलेला तो साथीचा हात, मला अव्यक्तपणे बरंच काही सांगून गेला, आणि मनात एक अंकुर फुलू लागला..
त्या निवडणुका आणि नंतर खोपोलीत झालेल्या कॅम्पच्या निमित्ताने आम्ही एकमेकांच्या अधिक परिचयाचे झालो. आमची मनं जुळतायत, याची खात्री पटत गेली आणि  कॅम्पमध्ये एकमेकांशी बोलताना मी माझं प्रेम व्यक्त केलं.
तिनंही लगेचच होकार दर्शविला
तिचे वडील नुकतेच गेले होते. वर्षांच्या आत लग्न लावायचे म्हणून घरच्यांचं दडपण होतं. आमच्या प्रेमप्रकरणाची कल्पना घरी नव्हती. तिच्यासाठी आलेलं एक स्थळ घरच्यांनी पसंत केलं, आणि आम्ही हबकलो. आता काय करायचे? प्रेम संपवायचे किंवा स्वत:ला. आत्महत्येच्या विचाराने घराबाहेर पडलो. पण, आयुष्य संपविण्यापेक्षा घरातून पळून जाऊन लग्न केले तर कसे, असा विचार चमकून गेला. आम्ही कोणाला न सांगता घराबाहेर पडलो. देवळात लग्न केलं आणि थोडेफार पैसे खिशात होते त्यातून कोल्हापूर, अक्कलकोट या ठिकाणच्या धर्मशाळांमध्ये राहत फिरत राहिलो. प्रवासात आम्हाला गोव्याचे एक वृद्ध दांपत्य भेटले. या अपरिचित दांपत्याशी आमची चांगली मैत्री झाली. त्यांच्या आग्रहावरून आम्ही गोव्याला आठ दिवस राहूनही आलो.
खिशातले पैसे संपल्यावर घालमेल सुरू झाली. मामाला मदतीसाठी फोन केला असता तिच्या आईने पोलिसात माझ्या विरुद्ध तक्रार केल्याचे कळले. आम्ही अटकपूर्व जामिनाकरिता अर्ज करण्याकरिता गेलो असता बोटांचे ठसे घेताना पोलिसांना मी अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. मी तेव्हा अवघा १७ वर्षांचा होतो. पोलिसांनी उषाशी चर्चा केली. ती तिच्या निर्णयावर ठाम होती. मग पोलिसांनीच आमचे नोंदणी पद्धतीने लग्न लावून दिले. तोपर्यंत आमच्या लग्नाला कोणताच वैधानिक आधार नव्हता. त्यानंतर पोलिसांनी ती केस बंद केली.
लग्नाची गाडी रुळावर आल्यानंतर झगडा सुरू झाला तो परिस्थितीशी. लग्न अपरिहार्य परिस्थितीत करावे लागले तरी शिक्षण थांबवायचे नाही, असा निर्धार होता.
नर्सिगला प्रवेश मिळाल्यामुळे ती साडेतीन वर्षांच्या ट्रेनिंगसाठी सेंट जॉर्ज हॉस्टेलमध्येच राहत होती. समाजशास्त्रातून बीए केल्यानंतर मी मास्टर्ससाठी पुण्याला आलो. माझे सर्व शिक्षण किरकोळ नोकऱ्या करून आणि बँकेतून मिळालेल्या कर्जातून पूर्ण केले. आमची भेट क्वचितच होत असे. लग्न १९८१सालचे. पण, १९८६ पर्यंत आम्ही एकत्र असे कधी राहिलोच नाही. लग्नानंतर पाच वर्षांनी मुलगी झाली तेव्हा आम्ही आर्थिकदृष्टय़ाही स्थिर झालो होतो. आमचा एकत्र संसार सुरू झाला तो त्यानंतर.
– अजितकुमार बिडवे, समुपदेशक, कुटुंब न्यायालय.

Story img Loader