१९९५ सालची घटना आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री मनिषा कोईराला हिचा खून झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून छापून आल्या होत्या. मनिषा कोईराला त्यावेळी कारकीर्दीच्या शिखरावर होती. तिचा ‘बॉम्बे’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. या बातम्यांमुळे मोठे वादळ उठले. पण, त्या बातम्यांच्या खाली कुठेतरी बारीक अक्षरात ती जाहिरात असल्याचे छापण्यात आले होते. ‘क्रिमिनल’ या मनिषाच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठीची ती जाहिरात होती. त्यानंतर अशाप्रकारच्या जाहिराती असाव्यात का?, यावरून वादाचे मोहोळही उठले होते. त्यानंतर निर्मात्यांनी प्रसिध्दीसाठी वेगवेगळे मार्ग चोखाळायला सुरूवात के ली. नीरज पांडेच्या ‘स्पेशल २६’ या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमारने पुन्हा एकदा प्रसिध्दीचा हाच फंडा उपयोगात आणला आहे.
‘स्पेशल २६’ ची कथा १९८७ च्या सत्य घटनेभोवती फिरते. या चित्रपटासाठी अक्षयने कुठेही मुलाखत दिली नाही की पत्रकार परिषद घेतली नाही. मात्र, देशभरातील निवडक वर्तमानपत्रातून सीबीआय अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी छापे घातल्याच्या बातम्या छापून येऊ लागल्या. आणि लोकांचे धाबे दणाणले. इंटरनेटवर, वृत्तवाहिन्यांवरही या बातम्या दाखवल्या गेल्या. तेव्हा हे नेमके काय आहे?, सीबीआय अधिकाऱ्यांनी घातलेले छापे म्हणजे केजरीवाल टीमने मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना जेरीस आणण्यासाठी चालवलेला उद्योग तर नाही ना?, अशी विचारणा वर्तमानपत्राच्या कार्यालयात होऊ लागली. तेव्हा कुठे ‘स्पेशल २६’ या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठीची ती जाहिरात होती हे स्पष्ट झाले. या टीजर कॅम्पेनची सुपीक कल्पना अभिनेता अक्षय कुमारच्याच डोक्यातून अवतरली होती. मुळातच या चित्रपटाची आधी कुठेच चर्चा झाली नव्हती. त्यामुळे लोकांना याची काहीच कल्पना नव्हती. त्यात वर्तमानपत्रातून बातम्या छापून आल्यामुळे लोकांची उत्कंठा वाढली. असाच काहीसा प्रकार ‘स्टार प्लस’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘मुझसे कुछ कहती है यह…खामोशियॉँ’ या लांबलचक नावाच्या मालिकेच्या निर्मात्यांनीही केला होता. ही मालिका वाहिनीवर प्रसारित होण्याच्या महिनाभर आधीपासून शहरातील मुख्य रेल्वे स्थानकांवर, बस स्थानकांवर ‘तुम्ही या मुलीला पाहिले का?’, अशा आशयाच्या मोठमोठय़ा जाहिराती, पोस्टर्स लावले गेले होते. वर्तमानपत्रातूनही ‘गौरी भोसले बेपत्ता आहे’, अशा बातम्या छापून आल्या आणि वाहिन्यांवर तर ‘गौरीशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. ही अनिवासी भारतीय मुलगी कुठेतरी हरवली आहे’, अशा भलभलत्या बातम्या दिल्या जात होत्या. हा सगळा खटाटोप या मालिकेसाठी होता, हे नंतर स्पष्ट झाले. या मालिकेची मुख्य नायिका गौरी भोसले हरवते, या कथेपासून ही मालिका सुरू होणार होती आणि म्हणून अशाप्रकारच्या प्रसिध्दीचा घाट घालण्यात आला होता. बदलत्या काळानुसार मालिका आणि चित्रपटांचे पीक वाढतच चालले आहे. या सगळ्या गर्दीत आपला प्रेक्षक गाठायचा तर निर्माते-दिग्दर्शकांना प्रसिध्दीच्या या तऱ्हांचा वापर करावाच लागतो आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा