नरभक्षक बिबटय़ाला जेरबंद करतांना वन अधिकाऱ्यांची चांगली दमछाक होत असतांना यापूर्वी जेरबंद करून ठेवलेल्या चार बिबटय़ांना कोणत्या जंगलात सोडायचे, या वादात ते चौघे बिचारे पिंजऱ्यात अडकून पडले आहेत. यातील दोन बिबट मोहुर्लीच्या बचाव केंद्रात, तर दोन बिबट ब्रम्हपुरी वन कार्यालयात ठेवण्यात आले असून गावकऱ्यांच्या हल्ल्यातून बचावलेले बिबटय़ाचे पिल्लू रामबाग नर्सरीत उपचार घेत आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावात नरभक्षक बिबटय़ाने अक्षरश: धुमाकूळ घातलेला आहे. आतापर्यंत आठ गावकऱ्यांचे बळी घेणाऱ्या या बिबटय़ाला दिसता क्षणी गोळय़ा घाला किंवा जेरबंद करण्याचे निर्देश प्रधान मुख्य वनसंरक्षक नकवी यांनी दिले आहेत. या आदेशानुसार शार्प शुटरची तीन पथके पायली, भटाळी, किटाळी, चोरगाव व आगरझरीच्या जंगलात नरभक्षक बिबटय़ाचा शोध घेत फिरत आहेत. तर चार दिवसांपासून बिबटय़ा शार्प शूटर्सना चकवा देत जंगलात भटकत आहे. नरभक्षक बिबटय़ाने वनाधिकाऱ्यांच्या नाकात चांगलाच दम आणला आहे. कधी किटाळी, तर कधी आगरझरीच्या जंगलात बिबटय़ाचा मागोवा घेतांना अधिकाऱ्यांची चांगली दमछाक होत आहे.
एका नरभक्षक बिबटय़ाने वनखात्याला हादरवून सोडले असतांना यापूर्वीच जेरबंद करून ठेवलेले चार बिबट मात्र कुठे सोडायचे, हा गंभीर प्रश्न वनखात्याला पडला आहे. नरभक्षक बिबटय़ाने आठ लोकांचे बळी घेतल्याने परिसरातील गावांमध्ये वनखात्याप्रती तीव्र रोष आहे. साधा वन कर्मचारीही गावात आला, तर गावकरी त्याला हाकलून लावत आहेत. यापूर्वीच्या तीन ते चार प्रकरणात तर गावकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांना बंदिस्त करून ठेवण्याचा व जंगल जाळण्याचाही प्रयत्न केला. वनाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची कशीबशी समजूत काढली, मात्र नरभक्षक बिबट अद्याप जेरबंद न झाल्याने किंवा शार्प शूटर्सच्या बंदुकीचा बळी न पडल्याने हा रोष वाढतच आहे. त्यामुळे जेरबंद बिबटय़ांना कोणत्या जंगलात नेऊन सोडायचे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. या जेरबंद चारपैकी दोन बिबट मोहुर्लीच्या बचाव केंद्रात ठेवण्यात आले आहे, तर उर्वरीत दोन बिबट ब्रम्हपुरी वन विभागाच्या कार्यालयात आहेत. यातही मोहुर्लीत जेरबंद असलेला एक बिबट तर वष्रेभरापासून पिंजऱ्यात अडकून पडला आहेत. हा बिबट आता पूर्णपणे माणसाळला असून त्याला जंगलात सोडले तर वाघ किंवा बिबटच त्याची शिकार करतील, अशी भीती वनखात्याला आहे, तर १० एप्रिलला आगरझरीच्या जंगलात तुकाराम धारणे व मालन मुनघाटे या दोघांचा बळी घेणाऱ्या बिबटय़ाला तेथेच जेरबंद करून ठेवले आहे. हा बिबट अतिशय आक्रमक असल्याने त्याला छोटय़ा पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे, तर सहा महिन्यापूर्वी ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत सिंदेवाहीच्या जंगलात जेरबंद केलेल्या एका बिबटय़ाला व एक छोटे पिल्लू ब्रम्हपुरीत पिंजऱ्यात अडकून पडले आहे. नरभक्षक बिबटय़ाचा धुमाकूळ व गावकऱ्यांचा संताप बघता या चार बिबटय़ांना नेमके कोणत्या जंगलात सोडायचे, असा गंभीर प्रश्न वनखात्याला पडला आहे. आणखी सहा महिने हे बिबट अशाच पध्दतीने पिंजऱ्यात अडकून राहिले तर त्यांना जंगलाऐवजी प्राणी संग्रहालयात सोडावे लागेल. त्यामुळे या बिबटय़ांना ताडोबा व्यतिरिक्त कोणत्याही जंगलात सोडा, अशी मागणी वन्यजीवप्रेमींनी लावून धरली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा