वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजयसिंह सलग पाच दिवसांसाठी ताडोबात मुक्कामाला आले आहेत. केवळ चिंतन व मनन करण्यासाठी हा दौरा असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्रास देऊ नये, असे आवाहन त्यांनी आज येथे केले.
देशातील राजकीय घडामोडींवर आपल्या खास शैलीत भाष्य करणारे व पक्षाच्या वर्तुळात ‘दिग्गीराजा’ म्हणून ओळखले जाणारे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री सिंह यांचे आज दुपारी येथे आंध्रप्रदेश एक्स्प्रेसने दिल्लीहून आगमन झाले. त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या दहा जवानांचा ताफा सोबत घेऊन आलेल्या सिंह यांचे रेल्वे स्थानकावर कॉंग्रेसचे नेते नरेश पुगलिया यांनी जंगी स्वागत केले. यावेळी महापौर संगीता अमृतकर, पक्षाचे नगरसेवक व जिल्हा कॉंग्रेस समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. आजपासून येत्या २ एप्रिलपर्यंत आपण ताडोबात मुक्कामाला असून केवळ जंगल भ्रमंती करणे, वन्यप्राणी न्याहाळणे आणि चिंतन-मनन करणे, हाच या दौऱ्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्थानिक नेत्यांना सांगितले.
ताडोबा व्याघ्र प्रकल्प देशातील काही उत्कृष्ट प्रकल्पांपैकी एक असून आरामाचा आनंद लुटण्यासाठीच येथे आलो तेव्हा या पाच दिवसात त्रास देऊ नका, अशी विनंती सिंह यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केली. ताडोबात विश्रांती घेण्याचा सल्ला माझ्या मुलाने दिला, असेही ते म्हणाले. सिंह २ एप्रिलला सकाळी ताडोबाहून येथे येत असून याच दिवशी त्यांच्या हस्ते जिल्हा कॉंग्रेस समितीतर्फे बांधण्यात आलेल्याा कन्नमवार भवनाचे उद्घाटन केले जाणार आहे. या कार्यक्रमानंतर ते काही काळ पुगलिया यांच्या घरी थांबणार असून नंतर थेट दिल्लीला परत जाणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसच्या नेत्यांनी दिली. राष्ट्रीय राजकारणात सक्रीय असलेले अनेक नेते आता विश्रांती व चिंतनासाठी ताडोबाची निवड करीत असल्याचे सिंह यांच्या दौऱ्यावरून स्पष्ट झाले आहे. काही दिवसापूर्वी भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी दोन दिवस ताडोबात राहून गेले. गेल्या वर्षी सरसंघचालक मोहन भागवत ताडोबात मुक्कामाला होते. तेव्हा भागवत यांनी विश्रांतीसोबतच संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची एक बैठक ताडोबात घेतली होती. आता संघावर नेहमी टीका करणारे दिग्विजयसिंह यांनी सुध्दा विश्रांती व चिंतनासाठी ताडोबाची निवड केली आहे.
‘मुलायमसिंगांना तो अधिकार’
समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यांनी कॉंग्रेसच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावर आक्षेप असला तरी विरोधक म्हणून त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे, असे मत सिंग यांनी आज येथे व्यक्त केले. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, ही सर्वाची इच्छा असून येत्या निवडणुकीनंतर सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या कॉंग्रेसचे खासदार हा निर्णय घेतील, असेही ते पत्रकारांशी बोलतांना म्हणाले.