राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केलेले विधान देशाच्या दृष्टीने धोकादायक असून काँग्रेस पक्षाला त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव खासदार वरुण गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देत असून याबाबत १९९२ मध्ये पुरावे मिळाले असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी केला आहे. त्यावर बोलताना वरुण गांधी म्हणाले, दिग्विजय सिंह यांनी काय बोलावे आणि काय बोलू नये, याचा विचार करण्याची गरज आहे. त्यांनी केलेले विधान देशाच्या दृष्टीने धोकादायक असून त्याचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागणार असल्याचे गांधी म्हणाले. रविभवनमध्ये काही काळ विश्रांतीसाठी आल्यानंतर वरूण गांधी यांनी प्रारंभी प्रसार माध्यमांशी बोलण्याचे टाळले होते. जवळपास एक तासाने ते स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर बाहेर आले आणि संघाबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया व्यक्त करून पुन्हा आत गेले.
तीन आठवडय़ापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या चार ज्येष्ठ नेत्यांनी संघ मुख्यालयात हजेरी लावल्यानंतर वरूण गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊन त्यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नरेंद्र मोदी यांची प्रचार आणि प्रसाराच्या दृष्टीने विविध समितीत्यांचे गठन केल्यानंतर वरुण गांधी आज पहिल्यांदाच नागपुरात आले. देशभरात निवडणुकीच्या दृष्टीने घेण्यात येणाऱ्या विविध नेत्यांच्या प्रचार सभांची जबाबदारी वरुण गांधी यांच्याकडे देण्यात आली आहे. आज सकाळी वरुण गांधी थेट रविभवनला गेले. त्या ठिकाणी काही काळ विश्राम केल्यानंतर महापौर अनिल सोले आणि इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वरूण गांधी यांची भेट घेतली. दुपारी दोनच्या सुमारास ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात आले. तेथे सरसंघचालक डॉ. भागवत यांच्याशी जवळपास दीड तास चर्चा केल्यानंतर ते विमानतळाकडे रवाना झाले.
तीन आठवडय़ापूर्वी पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी आणि त्यानंतर लालकृष्ण अडवाणी हे दोन बडे नेते नागपुरात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भेटीसाठी आले होते. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, प्रचार प्रमुख नरेंद्र मोदी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सरसंघचालकांची भेट घेतली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा