विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विविध पक्षांच्या प्रमुख उमेदवारांच्या संपत्तीत गेल्या वर्षांच्या तुलनेत वाढच झाली असून ती लाखाच्या घरात तरी आहे.
यंदा सव्वाशेहून अधिक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले असून त्यापैकी प्रथमच विधानसभा निवडणुकीत उतरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. एकूण उमेदवारांपैकी ३५ उमेदवार कोटय़धीश आहेत. दक्षिण नागपुरातून यंदा राकाँचे उमेदवार असलेले दीनानाथ पडोळे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. ते विद्यमान आमदार आहेत. यंदा त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची चल संपत्ती ६० लाख ५० हजार तर अचल संपत्ती ७५ लाख रुपये आहे. गेल्या निवडणुकीच्यावेळी २००९ मध्ये त्यांच्या नावे असलेली अचल संपत्ती २४ लाख रुपये होती. त्यांच्या चल व अचल दोन्ही संपत्तीत वाढ झाली असून ती लाखाच्या घरात आहे. दक्षिण पश्चिम मतदारसंघातून भाजपचे देवेंद्र फडणवीस रिंगणात आहेत. यंदा सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या नावे असलेली चल संपत्ती २ कोटी ३ लाख ३ हजार ६३० रुपये तर अचल संपत्ती १ कोटी ८१ लाख १० हजार ५०० रुपये आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी २००९ मध्ये त्यांची अचल संपत्ती २२ लाख ५० हजार रुपये होती. त्यांच्याही संपत्तीत वाढ झाल्याचे स्पष्ट होते.
यंदा नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी ३५ उमेदवार कोटय़धीश आहेत. दक्षिण-पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी मिळालेल्या प्रफुल्ल गुडधे पाटील यांची अचल संपत्ती ११ कोटी २४ लाख ७० हजार रुपये तर चल संपत्ती २ कोटी १९ लाख ७७ हजार ८३६ रुपये असल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. बहुजन समाज पक्षाचे उमेदवार राजेंद्र पडोळे यांची अचल संपत्ती १० कोटी २ लाख ५ हजार रुपये तर चल संपत्ती १४ लाख ३८ हजार १८ रुपये नमूद आहे.
दक्षिण नागपुरात निवडणूक लढवित असलेले सतीश चतुर्वेदी यांची चल संपत्ती १२ कोटी ८५ लाख ९८ हजार ५६६ रुपये तर अचल संपत्ती ११ कोटी ४४ लाख रुपये प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे.
२००९ मध्ये झालेल्या निवडणुकीच्यावेळी त्यांची चल संपत्ती ६ कोटी ७८ लाख ९२ हजार ८१६ रुपये तर अचल संपत्ती २ कोटी ३८ लाख ४० हजार रुपये प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. कृष्णा खोपडे यांची यंदाची चल संपत्ती २ कोटी ७६ लाख ६ हजार १६ रुपये तर अचल संपत्ती ३८ लाख रुपये नमूद आहे.

Story img Loader