बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहातील बिग बजेट चित्रपटांमध्ये वेशभूषाकार म्हणून आपण काम करू, असा कधी विचारच केला नव्हता. परंतु, आता काम करायला खूपच मजा येते आहे. ‘फॅशन’ या मधुर भांडारकर दिग्दर्शित चित्रपटापासून करिअरला सुरुवात झाली आणि आता आगामी ‘एबीसीडी’ म्हणजेच ‘एनी बडी कॅन डान्स’ हा चित्रपट नुकताच पूर्ण केला, असे सांगणारी दीप्ती म्हात्रे ही २७ वर्षांची मराठमोळी तरुणी आज बॉलिवूडची आघाडीची वेशभूषाकार आहे. या क्षेत्रातील आपल्या अनुभवांविषयी दीप्तीने ‘वृत्तान्त’शी मनमोकळ्या गप्पा माराल्या.
कोणत्याही चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखांबरोबरच अनेक छोटय़ा छोटय़ा व्यक्तिरेखा असतात. चित्रपटाचा विषय, त्याचा काळ याबरोबरच व्यक्तिरेखांचा आलेख कुठपर्यंत आहे अशा सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्या त्या व्यक्तिरेखांना योग्य असे कपडे, रंगसंगती, स्टाइलिंग आदी गोष्टी ठरवाव्या लागतात. अर्थात दिग्दर्शक, छायालेखक, नृत्य दिग्दर्शक आदी अनेकांशी चर्चा करूनच चित्रिकरणाला सुरुवात होण्यापूर्वी वेशभूषा तयार कराव्या लागतात, अशी माहिती दीप्तीने दिली. सध्या ती व तिचा सहकारी मोईज कपाडिया असे दोघे चित्रपटांसाठी वेशभूषाकार म्हणून काम करतात.
वरळीच्या ‘रहेजा स्कूल ऑफ आर्ट’मधून फॅशन टेक्नोलॉजी अभ्यासक्रम केल्यानंतर एका कारखान्यात फॅशन, कपडय़ांचे स्टायलिंग या क्षेत्रात नोकरी केली. फॅशन क्षेत्रातील काही ओळखीच्या व्यक्तींकडून एका चित्रपटासाठी वेशभूषा सहाय्यकाची गरज आहे. काम करशील का, अशी विचारणा झाली. माझ्या काही अटी होत्या. परंतु, त्या सुरुवातीला मान्य झाल्या नाहीत  पुन्हा १५ दिवसांनी वेशभूषाकार रिता दोढी यांनी संपर्क साधला व अटी मान्य असल्याचे सांगितल्यानंतर मग मी होकार दिला. याबाबतीत मी ‘लकी’ ठरले.  होकार दिला तेव्हा समजले की मधुर भांडारकर यांच्या ‘फॅशन’ या चित्रपटासाठी वेशभूषा सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.  त्या शिदोरीवरच आता मोईजसोबत मी स्वतंत्रपणे हिंदी चित्रपटांसाठी वेशभूषाकार म्हणून काम करतेय, असे दीप्तीने प्रांजळपणे सांगितले. ‘फॅशन’नंतर या क्षेत्रात काम करण्याविषयी आत्मविश्वास मिळाला. रिता दोढी यांनी संधी दिली आणि इथे कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात केल्यावर पहिल्यांदा अभिनेत्री मुग्धा गोडसेची वैयक्तिक स्टायलिस्ट, मॅनेजर म्हणून काम केले. ती काम करीत असलेल्या चित्रपटांसाठी वेशभूषा केल्यानंतर ‘द डर्टी पिक्चर’ हा बडय़ा बॅनरचा चित्रपट करण्याची संधी         मिळाली.
विद्या बालनने साकारलेली ‘सिल्क स्मिता’ सत्तरच्या दशकातील होती. तेव्हाचा काळ, त्यावेळची पोषाखाबद्दलची समज, त्या काळच्या दाक्षिणात्य चित्रपट उद्योगातील प्रचलित कपडे वगैरे बऱ्याच गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून नंतर वेशभूषा केली. रूपेरी पडद्यावर चमकधमक दिसत असली तरी पडद्यामागे वेशभूषा, रंगभूषा किंवा चित्रपटातील अनेक विभागांमध्ये काम करताना खूपच कष्ट घ्यावे लागतात. कष्ट करायची तयारी असेल तर हे क्षेत्र नक्कीच चांगले आहे, असे दीप्ती म्हात्रे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींना आवर्जून सांगू इच्छिते.

Story img Loader