गॅस सिलिंडर अनुदानाची रक्कम आधार क्रमांकाच्या माध्यमातून ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेस जिल्ह्य़ात १ जूनपासून प्रारंभ झाल्यानंतर केवळ सोळाच दिवसांत २५ हजारांवर ग्राहकांना त्याचा थेट लाभ मिळाला आहे.
राज्यात सर्वाधिक आधार नोंदणीचा बहुमान वर्धा जिल्ह्य़ाने मिळविला. त्यामुळे विविध अनुदान व योजनांचा लाभ आधारसंलग्न बँक खात्यामार्फ त देण्यासाठी वर्धा जिल्ह्य़ाची निवड करण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वध्र्यातील कार्यक्रमात १ जून रोजी योजनेचा शुभारंभ केला होता.
थेट अनुदान देण्यासाठी प्रथम गॅस सिलिंडरच्या ग्राहकांची निवड करण्यात आली असून १ जुलैपासून केरोसिन ग्राहकांना बँॅकेमार्फ त अनुदान देणे सुरू होणार आहे. वर्धा जिल्ह्य़ात एकूण २२ सिलिंडर वितरक आहेत. त्या अंतर्गत २५ हजार ८२७ ग्राहकांना १ कोटी १० लाख ६८ हजार ९२५ रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. एचपीसीएल कंपनीतर्फे गेल्या १६ दिवसांत २० हजार ३१४ ग्राहकांना ८७ लाख, आयओसीएलतर्फे ५ हजार २५५ ग्राहकांना २२ लाख, बीपीसीएलतर्फे २४८ ग्राहकांना १ लाखांचे अनुदान बँकेमार्फत जमा करण्यात आले. तीनही कंपन्यांचे जिल्ह्य़ात २ लाख ७२२ ग्राहक आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य असल्याने सर्वच ग्राहकांना थेट अनुदान मिळाले नाही. आधार वंचित ग्राहकांना तीन महिन्यांची मुदत आधारकार्ड काढण्यासाठी देण्यात आली आहे. त्यानंतर म्हणजे सप्टेंबरपासून आधारसंलग्न बँक खाते असणाऱ्यांनाच रोख अनुदान मिळेल. इतरांना बाजारभावाप्रमाणेच गॅस सिलेंडर विकत घ्यावे लागणार आहे, असा इशारा जिल्हाधिकारी एस.नवीन सोना यांनी दिला. आधार वंचित ग्राहकांनी आधार क्रमांक मिळाल्यानंतर सिलिंडर वितरकाकडे सिलिंडरची मागणी नोंदवायची. वितरक या क्रमांकाच्या आधारे अनुदानाच्या रकमेसाठी अर्ज करेल. संबंधित बँकेला तसे सूचित केले गेल्यानंतर ग्राहक बँॅकेतून स्वत:च्या अनुदानाचे पैसे काढण्यास पात्र ठरणार आहे.