विद्यापीठाची मान्यता नसतांना एमबीए, अभियांत्रिकी व बीसीए अभ्यासक्रमाच्या बोगस पदव्या देणाऱ्या नागपुरातील इंडियन बिझनेस स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे संचालक जितेंद्रसिंग महीपालसिंग चौहान यांना चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याची ३ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
शास्त्रीनगरातील मधुबन प्लाझा येथे इंडियन बिझनेस स्कूल ऑफ मॅनेजमेंट या संस्थेच्या वतीने एमबीए, अभियांत्रिकी व बीसीए अभ्यासक्रम सुरू करण्यात आले होते.
विद्यापीठाची कुठलीही मान्यता नसताना विद्यार्थ्यांना बोगस पदव्यांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या लक्षात ही बाब येताच रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या आधारावर पोलिसांनी संस्थेच्या कार्यालयावर छापा मारून शिशीर हलधर, अनिल दहागांवकर व निरज मोहन वर्मा या तिघांना अटक केली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही स्कूल नागपुरातील जितेंद्रसिंग महीपालसिंग चौहान यांची होती. त्यावरून चौहान यांचा शोध पोलीस घेत होते. अशातच चौहान यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला. न्यायालयाने २७ नोव्हेंबर रोजी चौहान यांचा जामीन नामंजूर केला.
जामीन नामंजूर होताच पोलिसांनी जितेंद्रसिंग चौहान याला अटक केली. यानंतर त्याला जिल्हा न्यायालयाने ३ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director of buisness management school get arrested in chandrapur
Show comments