अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालकांतील गटतटाचे दर्शन मंगळवारी झालेल्या बैठकीवेळी घडले. अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केलेल्या विजय कोंडके व विजय पाटकर या दोघांनाही प्रत्येकी सात मते मिळाली. अखेर दोघांनी सव्वा वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्षपद विभागून घेण्याचा निर्णय घेतला. पहिल्या कालावधीसाठी माहेरची साडी फेम निर्माता विजय कोंडके यांची वर्णी लागली. तब्बल चार तास चाललेल्या कमराबंद बैठकीत संचालकांतील मतभेद चांगलेच ताणले गेले.    
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा २ ऑगस्ट रोजी येथील शाहू स्मारक भवनमध्ये अभूतपूर्व तणावात पार पडली होती. दोन गटातील वाद सभेवेळी उफाळून आले होते. परिणामी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांना पदाचा त्याग करावा लागला होता. या रिक्त झालेल्या पदावर निवड करण्यासाठी मंगळवारी महामंडळाच्या येथील कार्यालयात संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती. दुपारी एक वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी पाच वाजता संपली. बैठकीतील शब्दही बाहेर पडू नयेत यासाठी दारे-खिडक्या बंद करून संचालकांनी चर्चेचे गुऱ्हाळ चालू ठेवले होते.     
अध्यक्षपदासाठी दोन्ही गटांनी दावे केले. त्यामध्ये एकमत न झाल्याने निवडणूक घेण्याची वेळ आली. प्रभारी अध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. गुप्त मतदान होऊन विजय कोंडके व त्यांचे प्रतिस्पर्धी विजय पाटकर या दोघांनाही सात मते मिळाली. या स्थितीवर मार्ग काढण्यासाठी प्रदीर्घ काळ चर्चा झाली. अखेर सहमतीने दोघांनाही सव्वा वर्षांचा कालावधी वाटून देण्याचा निर्णय घेण्यात आला.    
निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना विजय कोंडके यांनी विजय पाटकर यांना सोबत घेऊन एकत्रित काम करणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, महामंडळाला भक्कम स्वरूप देण्यासाठी शासनाकडे नवीन योजना सादर करण्याचे काम प्राधान्याने केले जाणार आहे. मराठी चित्रपटाला ३० लाखाऐवजी ४० लाख रुपयांचे अनुदान मिळणारा शासन निर्णय व्हावा, याकरिता प्रयत्न केले जाणार आहेत. मावळते अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या कार्यकाळाबद्दल समाधानी नसल्याचा उल्लेख करून सुर्वे यांच्याकडून ७ लाख ३४ हजार रुपये भरून घेण्यात यावेत, असे सर्व संचालकांनी मत व्यक्त केले आहे. विजय पाटकर यांनी महामंडळाचा मुंबई हा स्वतंत्र विभाग होऊ शकत नाही. त्यामुळे कोणाचाही फायदा होऊ शकत नाही, असे नमूद करून त्या दिशेने प्रयत्न करणाऱ्यांना टोला लगावला. मुंबई कार्यालयाला टाळे लावण्याचा प्रकार चुकीचा असल्याची टिप्पणीही त्यांनी केली.
 मतभेदाच्या केंद्रस्थानी सुर्वे    
माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी वार्षिक सभेवेळी महामंडळाकडे लवकरच माझ्या नावे असलेली रक्कम भरणार असल्याचे स्पष्ट केले होते. याच मुद्यावरून आजच्या बैठकीत वाद होत राहिले. बैठकीनंतर सुर्वे यांनी पत्रकारांशी संवाद साधत अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडीची माहिती देण्यास सुरुवात केली. मात्र अन्य संचालकांनी हा अधिकार कोणी दिला असा सवाल उपस्थित करीत सुर्वे यांना रोखले. सुर्वे यांनी मिलिंद अष्टेकर यांच्या सूचनेवरून माहिती देत असल्याचे सांगितले. पण अष्टेकर यांनी आपली चूक झाल्याचे नमूद केले. त्यानंतर सुर्वे यांना शेजारच्या खोलीत नेण्यात आल्यानंतर तेथे विजय कोंडके यांनी बैठकीची माहिती दिली.

Story img Loader