अनेक दिवसांच्या काळानंतर मराठीत आलेल्या ‘मर्डर मिस्टरी’ या प्रकारातील ‘अशाच एका बेटावर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी वापरण्यात आलेल्या एका भित्तिपत्रकावर चित्रपटातील कलाकार सई ताम्हणकर ही ‘बिकिनी’ अवस्थेत दाखवली होती. मात्र हे भित्तिपत्रक प्रसिद्धीसाठी वापरू नये, अशी विनंती सईने निर्मात्यांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. निर्मात्यांनी मात्र कोणतेही म्हणणे न ऐकता ही भित्तिपत्रके सर्रास प्रसिद्धीसाठी वापरली, असे कळते. ‘नो एण्ट्री, पुढे धोका आहे’ या चित्रपटानंतर  सई पुन्हा एकदा ‘बिकिनी’मध्ये दिसली. हा चित्रपट खूप आधी चित्रित झाला असून दरम्यानच्या काळात सईचे लग्न झाल्याने आपली ‘ही’ भित्तिपत्रके प्रसिद्धीसाठी वापरू नयेत, अशी विनंती सईने निर्मात्या लीना नांदगावकर यांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत लीना नांदगावकर यांनी सई व आमच्यात वितुष्ट निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले.   तिचा ‘बिकिनी अवतार’ ही भूमिकेची गरज होती. तिच्या आणखी एका चित्रपटाचे चित्रीकरण चालू असल्याने ती ‘बेटावर’च्या प्रसिद्धीसाठी उपस्थित राहू शकली नाही, असे त्या म्हणाल्या. मात्र आमच्यात असा कोणताही वाद झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चित्रपट निर्मात्या असा कोणताही वाद नसल्याचे सांगत असताना सईनेही या प्रसंगावर भाष्य करण्याचे टाळले. हा चित्रपट प्रदर्शित होऊनही आता दोन आठवडे उलटून गेले आहेत. त्यामुळे याबाबत कोणतेही भाष्य करायचे नाही, अशी प्रतिक्रिया सईने दिली.

Story img Loader