शहरात डेंग्युच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असतानाच दुसरीकडे डासांचा प्रार्दुभाव रोखण्यात महापालिकेचा आरोग्य विभाग अपयशी ठरल्याची बाब जाकीर हुसेन रुग्णालयातील अस्वच्छतेवरून पुढे आली आहे. गच्चीवरील टाकीतून होणारी पाण्याची गळती आणि अस्वच्छता यामुळे डासांना पोषक वातावरण उपलब्ध झाले आहे. गंभीर स्वरूपाच्या या त्रुटी त्वरित दुर करून रुग्णालयाची नियमित स्वच्छता राखावी, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती रमेश धोंगडे यांनी दिले. या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
कथडा परिसरातील डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयाबद्दल स्थानिक नागरिकांसह नगरसेवकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. त्याची कारणमिमांसा करण्यासाठी बुधवारी सकाळी स्थायी समितीचे सभापती धोंगडे यांनी सकाळी रुग्णालयास अचानक भेट दिली. परंतु, या दौऱ्याची कुणकुण आरोग्य विभागाला आधीच लागली होती. यामुळे एरवी अंतर्धान पावणारे रुग्णालयातील डॉक्टर व इतर सर्व कर्मचारी सकाळपासून हजर होते. कधी नव्हे ते रुग्णालयाची स्वच्छता तत्परतेने करण्याची दक्षताही घेण्यात आली होती. सभापती व स्थानिक नगरसेवकांनी भेट दिली तेव्हा ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. रुग्णालयाची नियमित स्वच्छता होत नसल्याने रुग्णांना डासांचा कसा सामना करावा लागतो याची अनुभूती सर्वानी घेतली. गच्चीवर टाकीतून होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे शेवाळ पसरले आहे. ही बाब डासांचे प्रमाण वाढविण्यास कारक ठरली. आरोग्य विभागाने पाण्याची गळती रोखण्यासाठी कोणतीही उपाय केले नाहीत. त्याचा फटका लहान बालकांसह सर्वच रुग्णांना सहन करावा लागत आहे. बालकक्षात काचेच्या पेटीची व्यवस्था करण्याचे निर्देश धोंगडे यांनी दिले. रुग्णालयाचा आकार मोठा आहे. परंतु, त्या ठिकाणी अपघात विभाग नाही. स्वाईन फ्लुसाठी उभारलेल्या कक्षात विविध प्रकारची यंत्रसामग्री धुळखात पडली आहे. आगामी सिंहस्थाच्या अनुषंगाने रुग्णालयात अपघात विभाग सुरू करण्याच्या दृष्टीकोनातून नियोजन करण्याचे सूचित करण्यात आले आहे. गंभीर त्रुटींवर त्वरित कारवाई न केल्यास दोषींवर कारवाई करण्याचा इशाराही सभापतींनी दिला.
दरम्यान, शहरात मागील तीन ते चार महिन्यांपासून डेंग्युच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यास अस्वच्छतेमुळे डासांचा वाढलेला प्रार्दुभाव हे एकमेव कारण आहे. शहराची स्वच्छता राखण्याची जबाबदारी असणारा हा विभाग स्वत:चे रुग्णालय स्वच्छ राखू शकत नसल्यावर या घटनेने शिक्कामोर्तब केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा