जिल्ह्याच्या काही भागांत रोहिणी नक्षत्रातील पावसाने चुणूक दाखविली. त्यामुळे समाधानकारक पाऊस होण्याची आशा शेतकरी बाळगून होते. परंतु मृग नक्षत्रात पावसाने दडी मारल्याने जिल्हाभरातील खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. थोडय़ाशा पावसावर केलेल्या पेरण्या वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्याच्या काही तालुक्यांत कमअधिक प्रमाणात रोहिणी नक्षत्राचा पाऊस बरसला. सुमारे पाच-सहा वर्षांनंतर पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली. परंडा, लोहारा, उस्मानाबाद तालुक्यांत खरीप पेरण्यांनी वेग घेतला. परंतु मृग नक्षत्रात वरुणराजाने हुलकावणी दिली. अधूनमधून रिमझिम हजेरी लावणारा पाऊस १० दिवसांपासून मात्र गायब झाला आहे. त्यामुळे बहुतांश भागात पेरण्या रखडल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात केवळ सहा-आठ टक्क्यांच्या आसपास पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. दुष्काळाशी दोन हात केलेल्या शेतकऱ्यांनी खते, बियाण्यांसाठी कर्जाचे ओझे डोक्यावर घेत वा उसनवारीने पैसे काढून तयारी सुरू केली होती. मात्र, बियाणे, खते पावसाअभावी तशीच पडून आहेत. रोहिणी व मृग नक्षत्रांत पडलेल्या थोडय़ाशा पावसावर ज्या शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली, त्यांचे पीक आता उगवून वर आले आहे. या शेतकऱ्यांची धास्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. थोडय़ाशा पावसामुळे तयार झालेल्या ओलीवर पेरणी पूर्ण केली. आज ना उद्या पाऊस पडेल व पिके तरली जातील, या आशेवर पाणी फिरते की काय, याची चिंता पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे.
नळदुर्ग, शिरढोण परिसरातही पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी धास्तावले आहेत. तूर, मूग, उडीद, सोयाबीन आदी नगदी उत्पन्नाच्या पिकांपासून यंदा वंचित राहावे लागते काय, याची धास्ती शेतकऱ्यांना आहे. उमरगा परिसरात शेतकऱ्यांच्या आशा आता आद्र्रा नक्षत्रावर आहेत. उमरगा तालुक्यात ५ जूनला ४५ मिलिमीटर पाऊस झाला. पुढेही चांगला पाऊस होईल, या आशेने परिसरातील शेतकऱ्यांनी ७० टक्के पेरण्या पूर्ण केल्या. परंतु येत्या दोन-तीन दिवसांत पावसाने हजेरी न लावल्यास पेरणी वाया जाण्याची भीती आहे.

Story img Loader