शिस्त आणि संघर्षांतूनच मी शिकलो, बाबांची पुण्याई ही आमच्या समोर मार्गदर्शक तत्त्वे म्हणून सदैव प्रेरणा देणारी ठरत असते. चंद्रपूर जिल्ह्य़ातल्या वरोऱ्याच्या ओसाड, खडकाळ जमिनीवर ‘आनंदवन’ उभारून कुष्ठरुग्णांना आत्मसन्मान मिळवून देण्याची किमया असो की, त्यांना ताठ मानेने जगण्याचे बळ देण्याची जादू असो. ही बाबांचीच पुण्याई असल्याचे मत डॉ. प्रकाश आमटे यांनी मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या ‘आईज’ या व्याख्यानमालेत केले.
मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातर्फे ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. आमटे यांनी उपस्थितांना त्यांच्या जीवनातील अनेक अनुभव सांगत शिस्त आणि संघर्षांतूनच कसा यशाचा मार्ग मिळतो याची प्रचिती करून दिली. बाबा आमटे आणि त्यांचे ‘आनंदवन’ जगाच्या नकाशावर जाऊन जवळपास दोन दशके उलटली, तरी त्यांचे चिरंजीव प्रकाश आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी त्याच ‘भामरागड’ परिसरातल्या निबीड अरण्यात राहून आदिवासींचे जगणे सुसह्य़ व्हावे, म्हणून अहोरात्र प्रयत्नरत आहेत.
१९७३ साली हेमलकसाला लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला तेव्हा तिथले माडिया, गोंड आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडले होते. त्या जंगलापलीकडचे जग त्यांना माहीत नव्हते. आज मात्र तिथे सुसज्ज रुग्णालय आहे, शाळा आहे. तिथली मुले शिकून डॉक्टर, वकील होतात. वैद्यकीय उपचारांअभावी होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण अत्यल्प आहे. या ‘अंधाराकडून उजेडाकडे’ झालेल्या प्रवासाचे संपूर्ण श्रेय लोकबिरादरी प्रकल्पाच्या विलक्षण प्रयत्नांना असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकबिरादरी प्रकल्पात काम करताना डॉ. आमटे यांनी उपस्थितांना त्यांच्या जीवनातील अनेक कटू आणि गोड अनुभव सांगितले. ते पुढे बोलताना म्हणाले की, अनवट वाटेने जाऊन कुष्ठरोग्यांसाठी आपलं आयुष्य पणास लावण्यापेक्षाही ही कसोटी मोठी होती, कारण इथे थेट जिवाशीच गाठ होती. हेमलकसा, जिथे मुक्काम ठोकण्याचा निर्णय आम्ही घेतला होता, त्या परिसरातल्या आदिवासींसाठी मी आणि काही मोजकेच सहकारी हे उपग्रहावरचेच परग्रहावरचेच पाहुणे होते. शिवाय कोणत्याही क्षणी आजूबाजूच्या परिसरातले कोणते जनावर अंगावर चाल करून येईल, ते सांगता येणे कठीण होते. तरीही तिथे जाऊन राहायचा आम्ही निर्णय घेतला. आणि तिथूनच आमचा खरा प्रवास सुरू झाल्याचे त्यांनी सांगितलं.२००८ साली मिळालेल्या ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कारांपर्यंतच्या प्रवासाची कहाणी म्हणजे ‘प्रकाशवाटा’. डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे या दाम्पत्याने हेमलकसा आणि भामरागड परिसरातल्या लोकांनाच आपलेसे करून घेतले असे नाही, तर त्या परिसरातल्या प्राणीमात्रांशीही आगळाच ऋणानुबंध साधला. छोटय़ा-छोटय़ा प्रसंगांतून आमटे कुटुंबीयांचे मोठेपण हे अधोरेखित होत जाते. या कुटुंबाने समाजासाठी आपले आयुष्य उधळून दिले हे तर आहे आणि त्यांच्या त्यागातूनच आनंदवन, हेमलकसा, भामरागड परिसरात प्रकाशाच्या वाटा निर्माण झाल्या. या वाटेवरून उभा राहिलेला लोकबिरादरी प्रकल्प आज आपल्यापुढे आदर्श म्हणून उभा आहे. ग्रामीण आणि दुर्लक्षित भागात राहणाऱ्यांचे जीवनमान कसे असते, हे जाणून घेण्यासाठी एकदा तरी नक्की हेमलकसा भागाला भेट द्या, असेही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.

Story img Loader