सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त अजय सावरीकर यांची अखेर अपेक्षेप्रमाणे बदली झाली असून त्यांच्या जागी नाशिक विभागाचे उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांची नियुक्ती झाली आहे. सुवर्णमहोत्सवी वाटचाल करणाऱ्या सोलापूर महापालिकेची आर्थिक घडी पार विस्कटली असून मावळते आयुक्त सावरीकर यांना कामाची छाप पाडता आली नाही. नवे आयुक्त गुडेवार हे कडक शिस्तीचे सनदी अधिकारी म्हणून गणले जातात.
एकीकडे नाजूक आर्थिक स्थिती व दुसरीकडे अपुरे मनुष्यबळ, त्यातच माजलेली गैरशिस्त, भ्रष्टाचाराची बजबजपुरी यामुळे पालिकेच्या प्रशासनावर सावरीकर यांना वचक निर्माण करता आला नाही. लोकप्रतिनिधी व नागरिकांतही पालिकेच्या निष्क्रिय कारभाराबद्दल ओरड होत असतानाच यंदाच्या दुष्काळ तथा पाणीटंचाईच्या भीषण परिस्थितीत पाणीपुरवठय़ाचा प्रश्न जटील झाला होता. शहरात सर्वत्र डिजिटल फलकांचे पेव फुटले असताना त्यावर कसलीही ठोस भूमिका न घेता उलट, त्याकडे काणाडोळा केला गेला. एलबीटी वसुलीसाठीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे त्याचा फटका विकास कामांवर होत असताना अखेर जनसामान्यात नकारात्मक प्रतिमा निर्माण झालेले आयुक्त सावरीकर यांची बदली ग्रामविकास खात्यात झाली आहे. महापालिकेत गतवर्षी २०६ कोटींची करवसुली करून महापालिकेत नवा इतिहास घडविता आला. शहरात पाणीटंचाईच्या प्रश्नावर सर्वाना विश्वासात घेऊन काम करता आले, त्याबद्दल आपण समाधानी असल्याची भावना सावरीकर यांनी व्यक्त केली.
नूतन आयुक्त गुडेवार हे शिस्तप्रिय सनदी अधिकारी म्हणून ओळखले जातात. विशेषत: राजकीय दबाव आणून बेकायदेशीर कामे करून घेणारे लोकप्रतिनिधी व पुढाऱ्यांना चाप लावण्याची क्षमता गुडेवार यांच्यात असल्याचे बोलले जाते. त्यांनी यापूर्वी कोल्हापूर, उस्मानाबाद आदी ठिकाणी सेवा केली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम हे कार्यरत असताना त्यांच्या जोडीला महापालिकेचे आयुक्त म्हणून गुडेवार हे रुजू होत असल्याने प्रशासनात योग्य समन्वय निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कडक शिस्तीचे चंद्रकांत गुडेवार सोलापूर महापालिकेचे आयुक्त
सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त अजय सावरीकर यांची अखेर अपेक्षेप्रमाणे बदली झाली असून त्यांच्या जागी नाशिक विभागाचे उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांची नियुक्ती झाली आहे.
First published on: 04-07-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disciplined chandrakant gudewar designated a commissioner of solapur mnc