औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारीसाठी स्वपक्षातील कार्यकर्त्यांबरोबरच अन्य पक्षांतील काही कार्यकर्ते संपर्कात असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले. पदवीधर मतदारसंघात उमेदवार कोण, याची चाचपणी गुरुवारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून सुजितसिंह ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली. ते आजच्या बैठकीला उपस्थित होते. मराठवाडय़ातील पदाधिकाऱ्यांबरोबर उमेदवारीसाठी इच्छूक असणारे भाजपचे कार्यकर्तेही बैठकीला उपस्थित होते.
पदवीधर मतदारसंघाच्या राज्यातील तीनही जागांसाठी अजून उमेदवार ठरला नाही. मात्र, येत्या १५ दिवसांत तो ठरवू, असेही मुंडे म्हणाले. बीड जिल्हा बँकेच्या प्रकरणात कारवाईत दुजाभाव केला जात आहे. राष्ट्रवादीच्या बहुतांश नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्यांना जाणीवपूर्वक अटक केली जात नाही. पोलीस विभाग कारवाईच करीत नाही. शेंदाड शिपायाची भूमिका पोलीस घेत आहेत. जिल्हा बँकेत १०० कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोळ असतानाही सरकार नेत्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. मराठवाडय़ातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीपूर्वी पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार कोण, यावरून बरीच चर्चा झाली. या निवडणुकीसाठी इच्छूक असणाऱ्या माजी महापौर विजया रहाटकर, शिरीष बोराळकर, प्रवीण घुगे आदी इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू होती. उमेदवार कोण, हा निर्णय लवकरच होईल, एवढे आज सांगण्यात आले.
‘शेतकरी संघटनेशी बोलणी करावी’
राज्य सरकारने शेतकरी संघटनेशी ऊसदराबाबत बोलणी करावी. उद्या (शुक्रवारी) त्यांचा मेळावा आहे. या अनुषंगाने आपणास सरकारने सूचना विचारल्यास योग्य ठिकाणी ती करू. मात्र, सरकारने संघटनेशी बोलणी करायला हवीत, असे मत मुंडे यांनी व्यक्त केले. तिसऱ्या आघाडीत राष्ट्रवादीच्या प्रवक्तयाने जाणे ही धूळफेक आहे. शरद पवार तिसऱ्या आघाडीत जाणार नाहीत. ती शुद्ध नौटंकी आहे, असेही मुंम्डे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा