उद्योगाच्या विकासासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कोणत्या त्रुटी असतात, उद्योगांची उभारणी करताना कशाला महत्त्व द्यावे, यासंदर्भात येथे उद्योजकांसाठी आयोजित परिसंवादातून मार्गदर्शन करण्यात आले. नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) आणि स्मार्ट ट्रेनिंग अॅण्ड कन्सल्टन्सी सव्र्हिसेस यांच्या वतीने निमा हाऊस येथे हा परिसंवाद झाला.
व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, स्मार्ट ट्रेनिंग अॅण्ड कन्सल्टन्सी सव्र्हिसेसचे महाव्यवस्थापक जगदीश आहेर, व्हिनस वाणी उपस्थित होते. जगदीश आहेर यांनी उद्योजकांकडून उद्योग विकासासाठी कोणत्या गोष्टी चुकवतात व त्यावर काय उपाययोजना करणे गरजेचे आहे, हे मांडले. यशस्वी उद्योजक तयार करणे, उद्योजकांनी उद्योगांची उभारणी करताना विशिष्ट बाबींचा विचार करावा. उद्योजक आपल्या दृष्टिकोनातून काही ठरावीक चौकटीत विचार करीत असतो. या चौकटीतून बाहेर पडल्यावर, कल्पनाशक्तीच्या पलीकडे जाऊन त्यांनी विचार केल्यास नक्कीच उद्योगवाढीस चालना मिळेल.
उद्योगास दिशा दिली तर उद्योगवाढ होते. उद्योगवाढीसाठी ज्ञान, कौशल्य, इच्छाशक्ती, सवय व योजना या गोष्टी असणे आवश्यक आहे. तरच व्यवसाय, उद्योग ज्या पातळीवर आहे, त्याहून त्यांचा अधिक विकास होईल. प्रत्येक पातळीवर जाण्यासाठी नवनवीन गुणांचा अवलंब केला पाहिजे. उद्योग उभारणीसाठी जे ज्ञान लागते, त्यावर आणि कर्मचाऱ्यांमधील नात्यावरही आहेर यांनी प्रकाशझोत टाकला.
काही वेळेस एकच व्यक्ती अनेक कामे करीत असतो, परंतु यामुळे कोणतेही काम व्यवस्थित होत नाही. व्यक्ती ज्या कामात तज्ज्ञ असेल, तेच काम त्यांनी करावे. उद्योगांचा विकास करावयाचा असेल तर त्या दिशेने तशी वाटचाल करावयास हवी, वैयक्तिकरीत्या उद्योजकांच्या डोक्यात प्रगतीकडे वाटचाल करण्याची योजना असते, ती योजना सगळ्यांसोबत मांडली तर एकाच दिशेने सगळ्यांची वाटचाल होऊन उद्योगधंदा वाढीस मदत होते, असेही ते म्हणाले. बैठकीस निमा सिन्नरचे अतिरिक्त सचिव आशीष नहार, मंगेश काठे, विरल ठक्कर, विजयकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा