धान्य, रॉकेल आणि साखर यांची रास्त भाव दुकानातून होणारी विक्री शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे होते आहे की नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांनी दिल्या. दक्षता समितीच्या बैठकीत गॅस सिलेंडरचा पुरवठा, स्वस्त धान्याचे दर या अनुषंगाने सदस्यांनी प्रश्न विचारले होते. तसेच साखरेच्या गुणवत्तेबाबत समिती सदस्यांनी केलेल्या सूचनेचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे लवांडे यांनी सांगितले.
स्वस्त धान्य दुकानातून पाम तेलाचा पुरवठा व्हावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असून कार्डधारकांना साखर नियमित पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेत असल्याचे लवांडे यांनी या बैठकीत सांगितले. या बैठकीस इकबालसिंग गिल, सुभाष ठोकळ, विभावरी मोरे, सूर्यकांत थोरात, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी बालाजी क्षीरसागर, किशोर देशमुख आदींची उपस्थिती होती. नवीन स्वस्त धान्य दुकानांसाठी मिळालेल्या सर्व प्रस्तावाची माहिती प्रगटन स्वरुपात प्रसिद्धीस देण्याचेही बैठकीत ठरविण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discussion on quality of sugar in vigilance council meeting