सामाजिक कार्याची धुंदी आपल्यातील माणूसपण जागवते, असे म्हणतात. याच भावनेतून पनवेलमधील एका सामाजिक कार्यकर्त्यांने बेवारस मृतदेहांचे पालकत्व स्वीकारले आहे. ज्या बेवारस शवांचे वारसदार अंत्यविधीवेळी उपलब्ध होत नाहीत, अशा शवांचे पालकत्व स्वीकारून त्यांना खांदा देण्याचे कार्य प्रदीप ठाकरे करीत आहेत. ठाकरे यांनी गेल्या चार वर्षांत कुणीही न स्वीकारलेल्या २०० बेवारस मृतदेहांना अंत्यविधीची मोफत सोय उपलब्ध करून दिली.
नवीन पनवेल येथील सुकापूर परिसरातील युगांतक कॉम्प्लेक्समध्ये प्रदीप ठाकरे यांचे कार्यालय आहे. समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून प्रदीप यांचा सामाजिक कार्याचा प्रवास सुरू झाला. बेवारस अवस्थेतील मृतदेहांचे योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावे यासाठी आपण काही तरी करावे, असे मनाशी पक्के करून प्रदीप यांनी एका रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आपला विचार प्रत्यक्ष अमलात आणला. हळूहळू अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे, फुले, हार व इतर साहित्याचा खर्चही वाढू लागला. मात्र कोणत्याही परिस्थितीत समाजसेवेचा हा वसा सुरूच राहावा यातून अंत्यविधी सेवा संस्थेचा प्रवास सुरू झाला.
स्वत:चा संसार रियल इस्टेटच्या व्यवसायातून चालवायचा आणि ९३२२०१४०९३ हा मोबाइल क्रमांक खणाणला की रुग्णवाहिका दामटवायची हा प्रदीप यांचा ध्यास बनला आहे. प्रदीप ठाकरे यांच्या या सेवाव्रती संस्थेला चार वष्रे पूर्ण झाली आहेत. बेवारस मृतदेहांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य पद्धतीने अंत्यविधी करण्याच्या ठाकरे यांच्या या कार्याची दखल घेत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अनेकांनी त्यांचे कौतुक केले. माझ्या सत्कारावेळी अनेकांनी फुले, हार आणले होते. मात्र आज एक विधी करायला ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो. समाजाने या अशा गोष्टींसाठी मदत करावी, असे आवाहन प्रदीप ठाकरे यांनी केले आहे.
यातील सर्वच मृतदेह बेवारस नसतात. काहींचे नातेवाईक अंत्यविधीच्यावेळी स्मशानात उपलब्ध नसतात. काहींना वेळही नसतो. अशा वेळी आम्ही नातेवाईक, आप्तेष्ट बनून अंत्यविधीचा कार्यक्रम पूर्ण करतो. खांदा कॅालनी येथील लाइफ केअर सेंटरने नातेवाईक येईपर्यंत चार ते पाच दिवस मतृदेह व्यवस्थित राहावा म्हणून एका शवपेटीची सोय केली आहे. आज अशा संस्थांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज बनली आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

Story img Loader