जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रावर एलएचव्ही व एएनएम पदासाठी होणाऱ्या भरती दरम्यान मंगळवारी सकाळी मोठा गोंधळ उडाला. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अहर्ता नसलेल्या उमेदवारांनी गर्दी केली असल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाने केला. तर या पदावर ‘एएनएम’ना भरती करून घ्यावे, अशी उमेदवारांची मागणी होती. त्यामुळे गोंधळ झाला. जमलेल्या महिला उमेदवारांनी आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार, सहायक आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके, गोविंद चौधरी यांच्या अंगावर धावून गेल्या. काहींनी त्यांना चप्पल दाखविली. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. पोलिसांनी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना नंतर परिसरातून बाहेर हाकलले. अशाप्रकारे भरती करता येऊ शकते का, याचे मार्गदर्शन मागवून पुढील कारवाई केली जाईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर चार पदांसाठी भरती सुरू आहे. स्टाफ नर्सची २२ पदे ‘एलएचव्ही’ची ३४ पदे सिकलसेल समन्वयक दोन पदे व तालुका समूह संघटकची तीन पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली होती. ही पदे कंत्राटी स्वरूपातील असून २३ ते ३१ डिसेंबरदरम्यान त्याबाबतच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. एलएचव्ही व एएनएम यांचा दोन वर्षांचा नर्सिगचा कोर्स व एमएससीआयटी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना १० हजार रुपयांच्या मानधनावर नियुक्तीचे आदेश दिले जाणार होते. सकाळी दहाच्या दरम्यान या पदासाठी पात्र असणाऱ्या महिला उमेदवार जिल्हा परिषदेसमोरील मोकळय़ा मैदानात जमा झाल्या. जाहिरात दिलेली शैक्षणिक अर्हता असल्याने एलएचव्हीपदावर नेमणूक करावी, अशी त्यांची मागणी होती, मात्र देण्यात आलेली शैक्षणिक अर्हतेत हे उमेदवार बसत नसल्याने मुलाखती रद्द केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे गोंधळ उडाला. त्यानंतर घोषणाबाजीला सुरुवात झाली. भरती झालीच पाहिजे, अशी मागणी लावून धरण्यात आली. काही महिला उमेदवारांनी अधिकाऱ्यांना चप्पल दाखविली. शाब्दिक चकमक उडाल्याने पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आला. तणाव वाढला. पोलिसांनी उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या आवारातून बाहेर काढले.

Story img Loader