सोलापूर शहरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर मात करण्यास महापालिका प्रशासनच आडकाठी घालत असल्याचा आरोप करीत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाची कोंडी करण्याचा प्रयत्न चालविला आहे, तर प्रशासनाने पाणी प्रश्नाशी संबंधित अनेक प्रस्ताव पालिका स्थायी समिती व प्रभाग समित्यांकडे अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने कार्यवाही करण्यास अडसर निर्माण होत असल्याचा प्रत्यारोप प्रशासनाच्यावतीने केला जात आहे. विधान परिषद सदस्य दीपक साळुंखे यांनी शनिवारी आयोजिलेल्या बैठकीत पालिका लोकप्रतिनिधी व प्रशासनात तू तू-मै-मै झाल्याचे पाहून आमदार साळुंखे अवाक झाले.
पावसाळा तोंडावर आला असताना शहरातील पाणी प्रश्नावर आमदार साळुंखे यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी पालिका प्रशासन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोणती कार्यवाही करते, याचा आढावा घेतानाच आगामी विधिमंडळ अधिवेशनात तसेच त्याअनुषंगाने मंत्रालयात होणाऱ्या बैठकांमध्ये पालिकेचे कोणते प्रश्न मांडावयाचे, याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली.
या आढावा बैठकीत सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासनावर नाकर्तेपणाचा आरोप करीत बरेच तोंडसुख घेतले. पाणीटंचाईवरील उपाययोजना अमलात आणण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही, निधी नाही अशी नेहमीची कारणे प्रशासनाकडून पुढे केली जातात. नगरसेवकांनी प्रशासनाच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर प्रशासनाच्यावतीनेही लोकप्रतिनिधींकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार केली. स्थायी समिती व अन्य प्रभाग समित्यांमध्ये अनेक प्रस्ताव अनेक दिवसांपासून मंजुरीविना प्रलंबित आहेत. सक्षम मंजुरी नसेल तर कामे कशी करायची, असा सवाल प्रशासनाने उपस्थित करीत लोकप्रतिनिधींच्या दुतोंडी प्रवृत्तीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. हे आरोप-प्रत्यारोप ऐकून आमदार साळुंखे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी प्रशासनाला कडक शब्दात सुनावले. पाणी आहे, निधीही आहे; तर योग्य नियोजन करून कार्यवाही का होत नाही, असा सवाल त्यांनी केला.