जिल्हा परिषदेत सत्ताधारी गटाकडून विकास निधीवाटपात भेदभाव होत असल्याची तोफ डागत विरोधी सदस्यांनी बठकीवर बहिष्कार टाकून सभागृहासमोरच उपोषण सुरू केले. निवेदन स्वीकारण्यास आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जावळेकर यांनाही बठकीस जाण्यापासून अडवून धरले. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र, रमेश आडसकर यांच्या मध्यस्थीनंतर आक्रमक सदस्य शांत झाले.
सत्ताधारी गटातील कुरघोडीचे राजकारण, विरोधकांशी समन्वयाचा अभाव, प्रशासनाची मनमानी यामुळे जि. प.मध्ये हे गोंधळनाटय़ घडले. जि. प.त राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, सर्वच पदाधिकारी स्वतंत्र गटाचे असल्यामुळे कोणाचाच कोणाला पायपोस नाही. परिणामी विरोधी सदस्यांशीही कोणाचा समन्वय नाही. मागील काही दिवसांपासून विकासनिधी वाटपावरून पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात विरोधी सदस्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. पदाधिकाऱ्यांमध्येही कोणत्याच मुद्दय़ावर एकमत होत नाही. परस्परांवर कुरघोडी करण्यात पदाधिकारी मश्गुल असल्याने निधी वाटपातून विरोधी पक्ष बेदखल झाला.
दलितवस्ती सुधार योजना, जलसिंचन योजनांसाठी आलेला निधी जास्तीत जास्त मिळवण्यासाठी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांमध्येच चढाओढ लागली. त्यातून विरोधी सदस्यांच्या वाटय़ाला नाममात्र निधी देण्यात आला. भाजप, शिवसेना युतीचे २३ सदस्य सभागृहात आहेत. निधीचे समान वाटप व्हावे, अशी मागणी विरोधी नेते मदन चव्हाण यांनी केली. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करून कामे मंजूर केल्याने संतप्त झालेल्या सदस्यांनी सोमवारी सर्वसाधारण बठकीवर बहिष्कार टाकला. दुपारी एक वाजता नियोजित असलेल्या बठकीला अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला वैयक्तीक कारणाने गरहजर राहिले. त्यामुळे अर्चना आडसकर यांच्या अध्यक्षतेखाली बठक सुरू होताच भाजप सदस्य निषेध नोंदवत सभागृहाबाहेर आले. गटनेते मदन चव्हाण, सुनंदा थावरे, बाळासाहेब दोडतले, किशोर जगताप, उषा मुंडे, दशरथ वनवे यांच्यासह सर्व सदस्यांनी सभागृहासमोर उपोषण सुरू केले. मुख्य कार्यकारी अधिकारी जावळेकर यांनी सदस्यांचे निवेदन स्वीकारले. मात्र, सभागृहात परत जात असताना युतीच्या सदस्यांनी त्यांना अडविले. त्यामुळे गोंधळ उडाला.
राष्ट्रवादीअंतर्गत कुरघोडी
जि. प. राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र, सर्वच पदाधिकारी स्वतंत्र गटाचे दिग्गज असल्याने अंतर्गत कुरघोडीमुळे कोणालाच कोणाचा पायपोस राहिला नाही. मागील काही दिवसांपासून निधीवाटपावरून सदस्यांमध्ये नाराजी होती. सोमवारच्या बठकीत याचे पडसाद उमटणार हे गृहित होते. त्यामुळे अध्यक्ष बठकीस फिरकलेच नाहीत, तर शिक्षण व आरोग्य सभापती संदीप क्षीरसागरही आले नाहीत. परिणामी रमेश आडसकर यांनी एकटय़ानेच युतीच्या आक्रमक सदस्यांना सामोरे जात यशस्वी शिष्टाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा