डोंबिवली एमआयडीसीतील घरडा सर्कल ते खंबाळपाडा (बंदिश हॉटेल) हा रस्ता नेमका कुणाच्या मालकीचा यावरून सध्या महापालिका, एमआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागात वाद सुरू आहेत. पावसाळ्यात या रस्त्यावर दररोज पाणी साचते. पाणी वाहून जाण्यास जागा नसल्याने मुसळधार पावसात याठिकाणी तळी तयार होतात. डोंबिवली शहरात प्रवेश करण्यासाठी हा रस्ता असल्याने चालकांना सर्वाधिक त्रास होत आहे.
या रस्त्याची मालकी येत्या दोन दिवसांत पालिका, एमआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सिद्ध करावी. अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. एमआयडीसीने हा रस्ता आमच्या मालकीचा नसल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पारळे म्हणाले, हा रस्ता महापालिकेच्या हद्दीत आहे. याबाबतची सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या परिसरातून जलवाहिनीचे काम करण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून २५ लाख रुपये भरणा करून घेतले. त्यानंतर पुढील कामासाठी परवानगी दिली. असे असले तरी महापालिका म्हणते हा रस्ता आपल्या हद्दीत नाही. या परिस्थितीत रस्त्याची मात्र वाताहत झाली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत नर्सरी आहेत. त्याला काही नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे. या अतिक्रमणामुळे रस्त्यावर वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute in corporation midc and department of public works over road ownership
Show comments