जिल्हा परिषदेला मिळालेल्या दोन नवीन कार पदाधिका-यांतील बेबनावाला पुन्हा निमित्त ठरल्या आहेत. कार दोन आणि त्या मिळवण्यासाठीच्या रस्सीखेचीत उतरले आहेत अध्यक्षांसहित चार पदाधिकारी. याचा फैसला कसा होणार, प्रशासनाला याची चिंता भेडसावत आहे. यातील दोन दावेदार जुने आहेत तर दोघांनी वाहने प्राप्त झाल्यानंतर दावा केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अध्यक्षांना जि. प.चे कोणतेही वाहन वापरण्याचा अधिकार आहे, तर मुख्य कार्यकारी अधिकारी कोणतेही वाहन कोणाला देऊ शकतात. दोन दिवसांपूर्वी दोन अम्बॅसॅडर जि.प.ला मिळाल्या. प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार त्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो) व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्यासाठी त्या मागवल्या गेल्या होत्या. आपली वाहने जुनी झाल्याने व वारंवार नादुरुस्त होत असल्याने नवीन वाहने मिळावीत अशी कृषी समितीचे सभापती बाबासाहेब तांबे व महिला-बाल कल्याण समितीच्या सभापती हर्षदा काकडे यांची जुनीच मागणी होती. काकडे सध्या इंडिगो कार तर तांबे अम्बॅसॅडर वापरत आहेत. नवीन वाहन उपलब्ध होण्यासाठी, त्याचा प्रस्ताव तयार करण्यापासून पाठपुरावा केल्याचा दावा ते करतात.
दोन वाहने प्राप्त होताच अध्यक्ष विठ्ठलराव लंघे व समाजकल्याण समितीचे सभापती शाहुराव घुटे यांनीही ती आपल्याला मिळावीत अशी मागणी केली. लंघे सध्या फोर्ड तर घुटे अँबॅसॅडर वापरत आहेत. फोर्ड दीड वर्षांपूर्वीची आहे. परंतु त्याच्या रचनेमुळे पाय दुखतात अशी लंघे यांची तक्रार असल्याचे समजले. आपण वापरत असलेली मोटार जुनी झाल्याचा घुटे यांचा दावा आहे.
आज कृषिदिनाच्या कार्यक्रमानंतर सीईओ रुबल अग्रवाल यांच्या दालनात लंघे यांच्यासह इतर तिघेही सभापती अनौपचारिक चर्चेचासाठी जमले होते. त्या वेळी दोन वाहनांसाठी चौघांनीही आपल्यालाच नवीन वाहनाची कशी आवश्यकता आहे, हे पटवून देत जोरदार रस्सीखेच केली. उपस्थित एका सदस्याने निर्णय अध्यक्षांवर सोपवण्याचा पर्याय सांगितला. मात्र ते स्वत:च नवीन वाहनासाठी इच्छुक असल्याने इतर तिघांच्या तो फारसा पसंतीस उतरला नाही. एका अधिका-याने किमान यासाठी तरी पदाधिका-यांत समन्वय निर्माण व्हावा, अशी मिश्कील टिप्पणी केली.
नवी वाहने द्यायची कोणाला?
जिल्हा परिषदेला मिळालेल्या दोन नवीन कार पदाधिका-यांतील बेबनावाला पुन्हा निमित्त ठरल्या आहेत. कार दोन आणि त्या मिळवण्यासाठीच्या रस्सीखेचीत उतरले आहेत अध्यक्षांसहित चार पदाधिकारी. याचा फैसला कसा होणार, प्रशासनाला याची चिंता भेडसावत आहे
First published on: 02-07-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute on the issue on the new vehicles