खेमनर अध्यक्ष, शेळके उपाध्यक्ष

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बाजीराव खेमनर (संगमनेर) व उपाध्यक्षपदी उदय शेळके (पारनेर) यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी आग्रही असलेल्या राष्ट्रवादीने ऐनवेळी मात्र काँग्रेसची विनंती मान्य करीत पक्षाचा दावा मागे घेतला.
बँकेत इंदिरा काँग्रेसचा थोरात गट व राष्ट्रवादी अशी सत्ता आहे. सुरूवातीलाच ठरल्यानुसार तीन वेळा थोरात गट व दोनवेळा राष्ट्रवादी अशी अध्यक्षपदाची वाटणी झाली होती. त्यानुसारच पाच वर्षे कारभार चालला. मात्र, आता मिळणाऱ्या वाढीव मुदतीसाठी राष्ट्रवादीने अध्यक्षपदाचा आग्रह धरल्याने या निवडीबाबत जिल्ह्य़ात उत्सुकता होती. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने त्यादृष्टीने मोर्चेबांधणीही सुरू केली होती. नव्या पदाधिकाऱ्यांना तीन, चार महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाची मुदत या महिना अखेरीसच संपते. मात्र, सहकारी संस्थांसाठी केंद्र सरकारने या कायद्यात सुचवलेल्या दुरूस्त्या राज्य सरकारने अद्याप स्वीकारलेल्या नाहीत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अस्तित्वात येणाऱ्या नव्या कायद्यानुसारच सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून तूर्त मुदत संपणाऱ्या संस्थांच्या संचालक मंडळांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळेच जिल्हा बँकेच्याही या संचालक मंडळाला दोन ते तीन महिन्यांचा वाढीव कालावधी मिळेल. त्यामुळेच अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने फारसा आग्रह धरला नाही, असे नंतर सांगण्यात आले.
नवे अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीपूर्वी सरकारी विश्रामगृहावर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बबनराव पाचपुते, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या संचालकांची बैठक झाली. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पक्षाचे संचालक या बैठकीला उपस्थित होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दूरध्वनीवर पातपुते यांच्याशी संपर्क साधून बँकेत जैसे थे ठेवण्याची पर्यायाने काँग्रेसकडेच अध्यक्षपद ठेवण्याची गळ घातली, त्याला मान्यता देत राष्ट्रवादीने आपला दावा मागे घेतला.
निवडीनंतर बोलताना कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, कोल्हे, पाचपुते, गडाख यांनी खेमनर व शेळके यांच्या गत कारभाराचे कौतूक करतानाच उसाअभावी साखर कारखान्यांसमोर उभे राहणारे संकट, सहकार कायद्यातील संभाव्य बदल, बँकिंगमधील स्पर्धा याविषयी वेळीच सतर्क होण्याचे सुतोवाच केले.