जिल्ह्य़ातील शासकीय रुग्णालयांमध्ये वर्ग एक व दोन संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची तब्बल ३९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे मंजूर असलेल्या १३५ पैकी केवळ ९६ अधिकाऱ्यांवरच जिल्ह्य़ातील रुग्णसेवेचा गाडा हाकला जात आहे. तृतीय वा चतुर्थ श्रेणीमधील ६४ पदे रिक्त असल्याने आरोग्यसेवेत व्यत्यय येऊन अनेकदा रुग्णाचे नातेवाईक नि रुग्णालय प्रशासनामध्ये वादाचे प्रसंग उद्भवताना दिसत आहेत.
येथे जिल्हा शासकीय रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उमरगा, परंडा, तुळजापूर येथे प्रत्येकी एक उपजिल्हा रुग्णालय आणि लोहारा, मुरूम, तेर, कळंब, वाशी आणि भूम येथे मिळून सहा ग्रामीण रुग्णालये आहेत. जिल्हा रुग्णालयात वर्ग एकची एकूण १९ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात ७ पदे भरली गेली. उर्वरित १२ पदे रिक्तच आहेत. तर वर्ग दोनच्या ३३ मंजूर पदांपैकी ४ पदे रिक्त आहेत. जिल्ह्य़ातील इतर रुग्णालयांमधून चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले जाते. अपघातातील जखमींची संख्याही येथे मोठी असते. मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी अनेकदा यंत्रणेवर ताण पडतो. परिणामी त्यावेळी हजर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्याचे प्रकार रुग्णांच्या नातेवाइकांकडून घडत आहेत.
येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्त्री रुग्णालयाची देखील अशीच अवस्था आहे. येथे वर्ग एकची ४ पदे मंजूर असताना केवळ दोनच पदे भरण्यात आली. वर्ग दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मंजूर ७ पदांपैकी १ रिक्त आहे. उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयातही वैद्यकीय अधिकाऱ्यांची ५, परंडा एक, तुळजापूर ७, लोहारा ग्रामीण रुग्णालयातील १, मुरूम २, तेर १, कळंब २ आणि भूम येथील ग्रामीण रुग्णालयातील १ पद रिक्त आहे. वर्ग तीनच्या मंजूर १७२ पैकी २७ आणि वर्ग चारची २२३ पैकी ३७ पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवरच कामकाज चालत आहे.

Story img Loader