जिल्ह्य़ातील टंचाईच्या परिस्थितीचे नियोजन करण्यासाठीच्या उपाययोजना राबवण्याबाबत जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा ठपका काँग्रेसने ठेवला आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने आज अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना आज याबाबत निवेदन दिले. दरम्यान, बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे हे पक्षाचे दोन्ही मंत्री दुष्काळी परिस्थितीची माहिती घेण्यासाठी एकत्रित जिल्हा दौरा करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी सांगितले.
जिल्ह्य़ातच पाणी टंचाई असल्याने जिल्ह्य़ातील कोणत्याही धरणातून बाहेरील जिल्ह्य़ासाठी पाणी सोडू नये व जिल्ह्य़ातील धरणात उपलब्ध असलेल्या पाण्याचे शेतात उभ्या पिकांसाठी आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली.
तत्पूर्वी झालेल्या पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त २२ ते २८ डिसेंबर दरम्यान विशेष सप्ताह आयोजित करण्यात आल्याची माहिती ससाणे यांनी दिली. २८ डिसेंबरला मुंबईत ‘वचनपूर्ती’ मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यासाठी जिल्ह्य़ातून जास्तीत जास्त कार्यकर्ते नेण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. दि. २२ रोजी पक्षाच्या वतीने प्रत्येक तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा व त्यांच्या वारसांचा गौरव व हुतात्मा स्मारकाची साफसफाई व हुतात्म्यांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पदाधिकारी विनायक देशमुख, ब्रिजलाल सारडा, राजेंद्र नागवडे, बाळासाहेब हराळ, बाळासाहेब गिरमकर, उबेद शेख, राजेश परजणे, अभिजित लुणिया, संपत म्हस्के, सुनिता भांगरे, सविता मोरे, निलिनी गायकवाड, बाळासाहेब भुजबळ, भास्करराव डिक्कर, दिप चव्हाण आदी उपस्थित होते.
जिल्ह्य़ातील जनावरांच्या छावण्या सुरु ठेवाव्यात व इतर तालुक्यातही छावण्या सुरु कराव्यात, गरज असेल तेथे पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करावेत, रोहयोची कामे त्वरित सुरु करावीत, स्वस्त धान्य दुकानात जीवनावश्यक वस्तू मिळत नाही त्यात लक्ष घालावे, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनांची प्रकरणे तातडीने मंजूर करावीत व त्यासाठी तालुका पातळीवर दरमहा सभा घेऊन प्रकरणांना मंजुरी मिळण्याचे आदेश द्यावेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.     
पक्षाला लाभले अखेर कार्यालय
जिल्हा काँग्रेस समितीला नगरमध्ये प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर कार्यालय मिळाले. जुन्या बसस्थानक चौकात, पूर्वी राष्ट्रवादीचे कार्यालय ज्या इब्राहिम बिल्डिंगमध्ये होते, त्याच जागेत काँग्रेसचे कार्यालय आजपासुन सुरू करण्यात आले. जिल्हाध्यक्ष ससाणे यांनी या कार्यालयाचे पक्षाच्या दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे वेळोवेळी जाहीर केले होते. मात्र, अखेर ससाणे यांनाच वाट पाहून हे कार्यालय सुरू करावे लागले. नव्या कार्यालयातील पहिल्याच बैठकीत पक्षाच्या महिला शहर जिल्हाध्यक्षाची नियुक्ती विश्वासात न घेता केल्याची तक्रार महिला कार्यकर्त्यांनी केली. या जागेत पूर्वी राष्ट्रवादीचे कार्यालय होते, या पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष पदाची नियुक्तीही रेंगाळली आहे, राष्ट्रवादीतील या वादाची सुरुवातही याच कार्यालयातून झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा