ठाणे जिल्हा नियोजन मंडळाच्या ४० जागांसाठी येत्या १३ फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार असून त्यासाठी आलेल्या १६३ उमेदवारी अर्जापैकी १६० अर्ज वैध ठरले आहेत.  मात्र महाराष्ट्रदिनी जिल्ह्य़ाचे विभाजन होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने हे मंडळ अल्पजीवी ठरण्याची शक्यता आहे.
ठाणे जिल्हा नियोजन मंडळात एकूण ५० सदस्य आहेत. त्यापैकी ४० सदस्य निवडणुकींद्वारे निवडले जातात. उर्वरित दहा सदस्यांची नियुक्ती केली जाते. जिल्ह्य़ातील सात महापालिकांचा एक मतदारसंघ (मोठे नागरी क्षेत्र) असून त्यातून २६ जणांची निवड होते. पाच नगर परिषदांच्या मतदारसंघातून (लहान नागरी क्षेत्र) दोन, तर जिल्हा परिषद मतदारसंघातून १२ जण निवडले जातात.
पालकमंत्री या नियोजन मंडळाचे अध्यक्ष, तर जिल्हाधिकारी सदस्य सचिव असतात. जिल्ह्य़ाच्या नियोजनासंदर्भात या मंडळाच्या बैठकीत चर्चा होत असते. येत्या ४ फेब्रुवारी रोजी विद्यमान जिल्हा नियोजन मंडळाची शेवटची सभा आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा विभाजनाचे वारे वाहत आहेत. यासंदर्भात नेमलेल्या समितीने आपला अहवाल शासनास सादर केला असून १ मेपर्यंत विभाजन होण्याची शक्यता दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली होती. या पाश्र्वभूमीवर जिल्हा नियोजनाच्या निवडणुकीवर विभाजनाचे सावट आहे.

Story img Loader