मराठवाडय़ातील जायकवाडी धरणात सोडलेल्या पाण्याबाबतचा गोंधळ लक्षात घेता जिल्ह्य़ातील मंत्र्यांचा सरकारमध्ये प्रभाव राहिला नसल्याची टिका भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली. याचवेळी येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे आमदार चंद्रशेखर घुले व शंकरराव गडाख यांनी मात्र या वक्तव्याला असहमती दर्शवली.
मुळा धरणातून लाभक्षेत्रातील शेतीला आवर्तन देण्याच्या मागणीसंदर्भात या तिन्ही मंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विचारलेल्या एका प्रश्नावर घुले व गडाख यांनी मौन पाळले, मात्र कर्डिले यांनी नगर जिल्ह्य़ाचा राजकीय प्रभाव संपल्याचे मान्य करीत त्यात सुधारणा केली. इतर लोकप्रतिनिधी नाही, मात्र तिन्ही मंत्र्यांचा सरकारमध्ये प्रभाव राहिला नसल्याचे ते म्हणाले. बहुदा त्याचीही या निर्णयाला मुकसंमती असावी. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा मराठवाडय़ातील भाजप-शिवसेनेचा प्रभाव कमी करून जनतेची सहानुभूती मिळवण्याच्या राजकीय हेतूनेच जायकवाडीला नगर व नाशिक जिल्ह्य़ातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप कर्डिले यांनी केला. जायकवाडीला सोडलेल्या पाण्यातूनच नगर जिल्ह्य़ातील लाभक्षेत्रातील बंधारे भरून देण्याची मागणीही त्यांनी केली.
घुले यांनी जायकवाडी धरणाच्या उभारणीसाठी नगर जिल्ह्य़ाने त्याग केल्याची आठवण करून दिली. ते म्हणाले, या धरणामुळे शेवगाव व काही प्रमाणात नेवासे तालुक्यातील शेतकरी मोठय़ा संख्येने विस्थापित झाले आहेत. आताही मराठवाडय़ाच्या हिताचा निर्णय घेताना नगर जिल्ह्य़ाकडे दुर्लक्षच झाले आहे. लाभक्षेत्र कोरडे ठेऊन जायकवाडीला पाणी दिल्यानंतर आता नगर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. गडाख यांनी शेतीच्या आवर्तनासाठी वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडू, असे यावेळी बोलताना सांगितले.