म्हाडावासीयांसाठीच्या विकास नियंत्रण नियमावलीत गेल्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा सुधारणा करण्यात आल्यामुळे पुनर्विकासाचे भिजत घोंगडे पडलेले असतानाच आता पालिकेकडून अभिन्यास मंजुरी मिळत नसल्यामुळे चटईक्षेत्रफळाचे वितरणही रखडले आहे. म्हाडावासीयांची कुंचबणा सुरूच असून त्यांना कुणी वालीच राहिलेला नाही, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.
म्हाडाच्या एकाही इमारतीच्या पुनर्विकासाची फाईल वर्षभरात हललेली नाही. २० सप्टेंबर २००९ पूर्वी ज्यांनी ना हरकत प्रमाणपत्रे घेतली आहेत, त्यांना प्रिमिअम भरून म्हाडाचे चटईक्षेत्रफळ स्वस्तात उपलब्ध झाले आहे. विशेष म्हणजे वांद्रे पूर्व येथील गांधी नगर विकसित करणाऱ्या विकासकांना रग्गड फायदा झाला आहे. आता मात्र म्हाडाकडून घरे बांधून घेतली जाणार आहेत. त्यामुळे पुन्हा सुधारित विकास नियंत्रण नियमावली जारी करण्यात आली आहे. यानुसार विकासकांना .५ चटईक्षेत्रफळ अधिक मिळणार असले तरी रहिवाशांच्या क्षेत्रफळात कपात करण्यात आल्यामुळे कमालीची अस्वस्थता आहे. विकासकांनी अगोदरच ४८४ चौरस फुटाचे घर देण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनापासून आता विकासकांनाही मागे हटणे अशक्य झाले आहे आणि .३ चटईक्षेत्रफळ दिल्यानंतरही म्हाडाला आवश्यक घरे बांधून देणे शक्य नसल्याचे विकासकांचे म्हणणे आहे. यामध्ये म्हाडावासीयांची मात्र कुचंबणा झाली आहे.
सुधारित नियमावलीचा अध्यादेश जारी होण्यास आणखी काही महिन्यांचा कालावधी आहे. अशावेळी काही इमारती अर्धवट अवस्थेत आहेत. या वसाहतींना २.५ चटईक्षेत्रफळ वितरित करण्याची मागणी होत आहे. परंतु अभिन्यास मंजूर झाल्याशिवाय ते शक्य नसल्यामुळे म्हाडा अधिकाऱ्यांची पंचाईत झाली आहे. अभिन्यास मंजूर झाल्याशिवाय चटईक्षेत्रफळ जारी करणे बेकायदा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा