शेतकऱ्यांकडील कर्जाच्या रकमेची वसुली करण्यासाठी आलेल्या जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना घेराव घातल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील भरोसा येथे घडली. आधी बँकेतील थकित रकमेची संचालकांकडून वसुली करा आणि एका दिवसातच आमचे पैसे घ्या, अशी आक्रमक भूमिका या वेळी शेतकऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे वसुली अधिकाऱ्यांना वसुली न करताच रित्या हातानेच गावातून काढता पाय घ्यावा लागला.
शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन आली असून शेतकरी ती विक्रीसाठी नेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे आता पैसे येत असल्याचे पाहून जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे.
भरोसा येथे गुरुवारी चिखली शाखेचे निरीक्षक अशोक रिंढे, शहर शाखाधिकारी राजेश ठेंग, भरोसा ग्रामसेवा सोसायटीचे सचिव व्ही. एस. डोंगरदिवे व श्रीराम कुटे हे पीककर्ज वसुलीसाठी आले होते.
वसुलीसाठी गावात अधिकारी आल्याचे पाहून शेतकऱ्यांनी एकत्र होत मारुतीच्या मंदिराजवळ या अधिकाऱ्यांना घेराव घातला.
या वेळी विविध प्रश्नांचा भडिमार शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर केला. जिल्हा बँक डबघाईस आल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सोसावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. जिल्हा बँकेतील संचालकांकडे २०० कोटींवर थकबाकी आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आधी थकित संचालकांची वसुली करावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी लावून धरली. थकित संचालकांची वसुली केल्यावर एकाच दिवसात शेतकऱ्यांकडील पैसे द्या, अशी भूमिका शेतकऱ्यांनी या वेळी घेतली.
शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका पाहता आपण बँकेचे कर्मचारी आहोत, त्यामुळे वसुलीसाठी गावात येणे, शेतकऱ्यांना विनंती करणे आपले काम आहे. वसुली देणे न देणे ही शेतकऱ्यांची इच्छा आहे, अशी बाजू मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न या वेळी अधिकाऱ्यांनी केला. शेवटी त्यांना तसेच परतावे लागले.
या वेळी कृष्णा शेटे, जगन्नाथ थुटृे, अंबादास पाटील, शे. सांडू, अंबादास जाधव, मुरलीधर थुट्टे, राजू थुट्टे, ज्ञानेश्वर थुट्टे, मोलाना कासीम, सखाराम गायकवाड, पंडित थुट्टे, संजय थुट्टे यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.

Story img Loader