जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जि. प. सभागृहात आयोजित सर्वसाधारण सभेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सभापतींनी द्यावीत, असा नियम असल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. तसेच जि. प.च्या नाटय़गृहासोबतच व्यापारी संकुलाच्या बांधकामासाठी जागा कोणत्या, याचे उत्तर सत्ताधारी देऊ शकले नाहीत. विरोधकांच्या प्रश्नांच्या भडीमारामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली.
जि. प. च्या बुधवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सुरुवातीला २४ जुलैला झालेल्या सर्वसाधारण सभेतील वृत्तान्तावर चर्चा झाली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे अधिकारीवर्ग देत असताना विरोधकांनी त्याला आक्षेप घेतला. ज्या-त्या विषयांच्या प्रश्नाचे उत्तर त्या-त्या संबंधित विभागाच्या सभापतींनीच सभागृहात द्यावे, असा नियम असल्याचा मुद्दा उपस्थित करून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. परिणामी सुमारे अर्धा तास सभागृहात गोंधळ उडाला. अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर विभागप्रमुख अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावे, हा तोडगा विरोधकांनी मान्य केल्यानंतर कामकाज सुरू झाले.
जि. प. सदस्य संजय दराडे यांनी सन २००७ ते २०१२ दरम्यान समाजकल्याण विभागाला प्राप्त निधी व झालेल्या कामांची माहिती मागितली. त्यांना अपूर्ण माहिती मिळाल्याचा मुद्दा दराडे यांनी उपस्थित करून समाजकल्याण अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. दरम्यान, सदस्यांनी केलेल्या वक्तव्यांची समाजकल्याण अधिकारी संगीता मकरंद यांनी आठवण करून दिली. ‘तुम्ही महिला अधिकारी आहात म्हणून सोडून दिले’ असे शब्द वापरताच सभागृहात आता या विषयावरून वाद वाढणार याचे भान सदस्यांना झाले आणि ज्येष्ठ सदस्य मुनीर पटेल यांनी तत्काळ हस्तक्षेप केल्याने समाजकल्याण विभागाच्या विषयावरील चर्चा तेथेच संपविली.
यानंतर जि. प. च्या जागेवर नाटय़गृह व व्यापारी संकुल बांधण्याच्या विषयावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. जि. प.च्या मालकीची जागा कोणती, कोठे बांधणार नाटय़गृह, असा प्रश्न विरोधकांनी विचारल्यावर सत्ताधारी उत्तर देऊ शकले नाहीत. पिण्याचे पाणी, औंढा येथील कावीळ लागण, शिक्षकांची भरावयाची पदे या विषयांवर चर्चा झाली. संभाव्य पाणीटंचाई उपाययोजना करा, अशी सूचना मुनीर पटेल यांनी केली.    
dis

Story img Loader