जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या अंतर्गत बदलीसंदर्भात चर्चेला पेव फुटले आहे. बदलीसाठी उच्छुक शिक्षकांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडे मनधरणी करणे सुरू केले आहे. या संदर्भात २८ ऑक्टोबरला ग्रामविकास विभागाकडून परिपत्रक लागू करण्यात आले आहे. त्याप्रमाणे नागपूर जिल्हा परिषदेत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. २०११ मध्ये ६५० शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. २०१२ मध्ये  ५५० शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यापैकी ८० टक्के शिक्षकांच्या बदल्या तालुक्याबाहेर झाल्या आहेत. ८०० शिक्षक बदली होण्याची वाट पाहत आहेत. घरापासून शाळा जवळ असावी, शाळेत जाणे-येणे सोयीचे व्हावे यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती तसेच जिल्हा परिषद सदस्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही शिक्षकांनी बदलीसाठी जवळीक साधण्याची धडपड सुरू केली आहे.
बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांकडून अर्ज मागवून ते अर्ज जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे जमा करावयाचे होते. अर्जाची छाननी होऊन त्यानंतर शिक्षकांच्या बदलींची यादी तयार करण्यात येणार आहे. तालुक्याबाहेर अनेक शिक्षकांच्या बदल्या झाल्याने त्यांना जाणे-येणे सोयीचे नसल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या कामकाजावर होत आहे. तसेच बदलीच्या ठिकाणी त्यांना घर भाडय़ाने घेऊन राहावे लागत आहे. पर्यायाने अधिक भरुदड त्यांच्यावर पडत आहे. आपली बदली योग्य ठिकाणी व्हावी यासाठी शिक्षकांच्या अधिकारी आणि पदाधिकारी यांच्याशी गाठीभेटी वाढल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा